लोकसत्ता टीम
नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने गट-क सेवा परीक्षा २०२१ मधील लिपिक टंकलेखक आणि करसहाय्यक पदासाठीचा अंतिम निकाल घोषित केला आहे.
टंकलेखक भरतीमध्ये मराठी संवर्गातून लातूर जिल्ह्यातील सूरज फडणीस आणि इंग्रजी संवर्गातून कोल्हापूर जिल्ह्यातील विनायक वजरेकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर महिलांमध्ये अनुक्रमे राधिका गोलहार आणि ज्योती काटे यांनी बाजी मारली आहे.आयोगाने लिपीक टंकलेखक पदासाठी मराठी संवर्गात एक हजार ६२ तर इंग्रजी संवर्गासाठी १६ उमेदवारांची अंतिम शिफारस यादी घोषित केली आहे.
आयोगाच्या वतीने कर सहायक संवर्गाचाही अंतिम निकाल घोषित करण्यात आला आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील राहुल विजय जेंगठे यांनी प्रथम तर महिला वर्गवारीतून अहमदनगर जिल्ह्यातील रिंकल हाडके यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. एमपीएससीने २२५ उमेदवारांची शिफारस जाहीर केली आहे. उमेदवारांना क्रमवारीसह त्यांचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. न्यायिक प्रकरणांमध्ये अंतिम निर्णयाच्या अधीन राहून निकाल जाहीर केल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले आहे. निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे.
अशा उमेदवारांनी १० दिवसांच्या आत आयोगाकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.