नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३, मधील लिपिक टंकलेखक व करसहायक या संवर्गाची ‘टंकलेखन कौशल्य चाचणी’ आणि पोलीस उपनिरीक्षकपदाच्या मुलाखतींसाठी केवळ मुंबई येथीलच परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत. यामुळे विदर्भासह मुंबईबाहेरील उमेदवारांवर अन्याय झाल्याची ओरड आहे.

‘एमपीएससी’तर्फे सप्टेंबर २०२३ मध्ये गट-क सेवा पदाच्या ७ हजार ५१० जागांसाठी जाहिरात देण्यात आली. त्यानंतर मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर आणि अमरावती अशा सहा केंद्रांवर मुख्य परीक्षा २०२३ घेण्यात आली. यानंतर टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. आयोगाने लिपिक-टंकलेखक व करसहायक या पदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी १ ते १३ जुलै दरम्यान मुंबई येथील विविध परीक्षा केंद्रांवर होईल असे जाहीर केले. त्यामुळे गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरपासून सर्वच उमेदवारांना मुंबई केंद्रावर जावे लागणार आहे. अनेक उमेदवार दुर्गम भागातील असून बिकट आर्थिक परिस्थितीत परीक्षा देतात. अशा कुठल्याही परस्थितीचा विचार न करता मुंबईला परीक्षा होणार असल्याने त्यांच्यावर मानसिक तसेच आर्थिक ताण आला आहे. याखेरीज पोलीस उपनिरीक्षकपदाच्या मुलाखती २ जुलैपासून मुंबई येथील केंद्रावरच होणार आहेत. यासाठीही उमेदवारांना मुंबई गाठावी लागणार आहे. यापूर्वी कमी विद्यार्थी असतानाही आयोगाने प्रत्येक विभागीय केंद्रांवर परीक्षा घेतली होती हे विशेष.

हेही वाचा >>> विधानसभा जिंकण्यासाठी महायुती आमदारांसाठी भरीव तरतूद; सत्ताधाऱ्यांच्या झोळीत निधीचे वाण!

दोन्ही परीक्षा एकाच कालावधीत

पोलीस उपनिरीक्षकपदाच्या मुलाखती आणि करसहायक टंकलेखन परीक्षा एकाच कालावधीत मुंबईत होत आहे. बरेच विद्यार्थी दोन्ही परीक्षांमध्ये सहभागी होणार आहेत. परंतु, परीक्षांचा एकच कालावधी असल्यामुळे कुठल्या तरी एका परीक्षेला मुकावे लागेल. त्यामुळे आयोगाने याची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

विरोध का

परीक्षेच्या एक ते दोन दिवसाअगोदर १६ तासांचा प्रवास करून मुंबईचे परीक्षा केंद्र गाठावे लागेल. मुंबई येथे निवासाची सुविधा करावी लागेल. प्रवास आणि अपुऱ्या झोपेमुळे परीक्षेत एकाग्र होता येणार नाही. ‘एमपीएससी’च्या अशा धरसोड धोरणामुळे आधीच कमी असलेला प्रशासकीय सेवेतील विदर्भाचा टक्का घटण्याची भीती आहे.

विदर्भातील राजकीय पुढाऱ्यांच्या निष्क्रियपणामुळे येथील विद्यार्थ्यांवर नेहमीच अन्याय केला जातो. टंकलेखन परीक्षा नागपूर, अमरावती, औरंगाबाद अशा विविध केंद्रांवर घेतली जाऊ शकते. याआधी परीक्षा झाल्या आहेत. – उमेश कोर्राम, स्टुडंट राइट्स असो.

टंकलेखन परीक्षेसाठी आवश्यक असलेले सॉफ्टवेअर हे केवळ मुंबई येथील परीक्षा केंद्रावर उपलब्ध असल्याने येथे परीक्षा घेतली जाते. विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल. – डॉ. सुवर्णा खरात, सचिव एमपीएससी