नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची(एमपीएससी) महाराष्ट्र गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षा-२०२३ लिपिक टंकलेखक आणि कर सहायक संवर्गाकरिता घेण्यात आलेली कौशल्य चाचणी परीक्षा आणि त्यानंतर या परीक्षेचा निकालही कायमच वादात सापडला आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले. जुलै २०२४ मध्ये टंकलेखन परीक्षा झाली असली तरी न्यायालयाच्या संथगतीमुळे परीक्षेचा निकाल आणि नियुक्त्या अद्यापही रखडल्या आहेत. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ साठी जाहिरात प्रसिद्ध करून दोन्ही सेवांची संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये सात हजारांवर लिपिक पदे तर ४८६ पेक्षा अधिक कर सहाय्यक पदांसाठी संपूर्ण प्रक्रिया घेण्यात आली. आयोगामार्फत एप्रिल २०२३ मध्ये पूर्व परीक्षा तर विषयांकित पदांची मुख्य परीक्षा १७ डिसेंबर २०२३ रोजी घेण्यात आली. सदर परीक्षेतून पात्र ठरलेल्या उमेदवारांची टंकलेखन कौशल्य चाचणी ०४ ते १३ जुलै २०२४ या दरम्यान घेण्यात आली. यात उत्तीर्ण तसेच अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर ३० सप्टेंबर, २०२४ रोजी जाहीर झाली होती. यानंतर सदर टंकलेखन कौशल्य चाचणीसंदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, औरंगाबाद येथे याचिका दाखल करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याचिकाकर्ता विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एक वर्षात आतापर्यंत न्यायालयाने बारावेळा सुनावणीसाठी तारखा दिल्या. ८ जानेवारीला अंतिम सुनावणीही झाली असली तरी अद्याप त्यावरचा निकाल देण्यात आला नाही. न्यायालयाच्या या संथगतीमुळे ‘एमपीएससी’ने अजूनही अंतिम निकाल जाहीर केलेला नसल्याने उमेदवारांची चिंता वाढली आहे. जवळपास पंधरा हजारांवर उमेदवार नियुक्तीच्या आशेने या निकालावर नजर ठेवऊ आहेत.

टंकलेखन कौशल्य चाचणीतही गोंधळ

पात्र उमेदवारांची टंकलेखन चाचणी परीक्षेदरम्यान अनेक तांत्रिक अडचणी आल्या. यामुळे उमेदवारांनी परीक्षा पद्धतीवर आक्षेप घेतला होता. त्यानंतर परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. या परीक्षेत काही विद्यार्थ्यांना जुने संगणक दिल्याचा आरोपही केला होता. शेवटी उमेदवारांनी याविरोधात न्यायालयात धाव घेतली.

‘एमपीएससी’चे म्हणणे काय?

‘एमपीएससी’ने यासंदर्भात सविस्तर पत्र काढले असून त्यानुसार, सदर टंकलेखन कौशल्य चाचणीसंदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, औरंगाबाद येथे याचिका दाखल करण्यात आली. ही न्यायिक प्रकरणे विचारात घेता ‘लिपिक-टंकलेखक’ व कर सहायक या संवर्गाच्या अंतिम निकालाची कार्यवाही सद्यस्थितीत प्रलंबित आहे. यासंदर्भात न्यायाधिकरणाच्या न्यायनिर्णयानंतरच पुढील कार्यवाही करणे शक्य होईल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpsc group c service skill test for clerk typist and tax assistant has faced controversy dag 87 sud 02