बुलढाणा: महाराष्ट्र लोकसेवा आयोगतर्फे आयोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. आता ही परीक्षा २५ ऑगस्ट २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. आयोगातर्फे या बदलाचे कारण स्पष्ट करण्यात आले नाही. महसूल कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन आणि राजकीय सामाजिक स्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यापूर्वी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा येत्या एकवीस जुलै २०२४ रोजी घेण्यात येणार होती. त्याप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यासह राज्यात या संयुक्त पूर्व परीक्षेचे नियोजन करण्यात आले. सर्व जिल्ह्यांतील परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले. अधिकारी, कर्मचारी यांच्या नेमणूक, प्रशिक्षण, पोलीस बंदोबस्त याचे नियोजन करण्यात आले. सर्व कोषागार (ट्रेझरी) कार्यालयांना परीक्षा साहित्या विषयी निर्देश देण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यातील सव्वीसशे परिक्षार्थींसह राज्यातील लाखो परिक्षार्थींना २१ जुलै रोजी परीक्षा असल्याचे कळविण्यात आले. यामुळे परीक्षेची जय्यत तयारी करण्यात आली.

हेही वाचा – अकोला : व्यसनाधीन मुलाने जन्मदात्या वडिलांना जिवंत जाळले

आता २५ ला

दरम्यान या तयारीच्या पार्श्वभूमीवर तारीख बदलाची सूचना देण्यात आली आहे. यामुळे २१ जुलै रोजी होणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता २५ ऑगस्ट रोजी होणार आहे. ही परीक्षा दोन सत्रांत होणार आहे. २५ ऑगस्टला सकाळी दहा ते दुपारी बारा आणि दुपारी तीन ते संध्याकाळी पाच या कालावधीत परीक्षा पार पडणार आहे.

परीक्षा स्थगित करण्यात आल्याची आणि आता ती २५ ऑगस्टला होणार असल्याची सूचना विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधित यंत्रणाना देण्यात आली आहे. या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्यावर असते. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकारी यांनी या बदलाची माहिती पोलीस अधीक्षक, जिल्हा कोषागार अधिकारी यांना देण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक यांना परीक्षा दरम्यान पोलीस बंदोबस्त लावण्याचे आदेश देण्यात आले आहे. जिल्हा कोषागार अधिकारी यांना संयुक्त पूर्व परीक्षेच्या साहित्याची मुदत २५ ऑगस्ट २०२४ वाढवून देण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

परीक्षार्थींना सरावाची संधी

दरम्यान परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना १ महिना चारदिवस सरावाची संधी मिळाली आहे. मात्र अत्यल्प वयोमर्यादा (दुर्देवाने जुलैमध्ये) संपणाऱ्या उमेदवाराची अडचण होण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय काहींसाठी घातक वा अडचणीचा ठरू शकतो. ही बाब तेवढीच महत्वाची आहे. बुलढाणा जिल्ह्यापुरते सांगायचे झाल्यास दोन हजार सहाशे वीस उमेदवार परीक्षा देणार आहे. बुलढाणा शहरातील आठ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्याचे नियोजन होते. यामध्ये शिवाजी विद्यालय, भारत विद्यालय, प्रबोधन विद्यालय, सहकार विद्या मंदिर, शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय, जिजामाता महाविद्यालय, शारदा ज्ञानपीठ, एडेड विद्यालयाचा समावेश होता.

हेही वाचा – गोंदिया : स्कुलबस व दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू, महिला गंभीर

कामबंद कारणीभूत?

दरम्यान परीक्षा एक महिन्याने पुढे ढकलण्यासाठी प्रामुख्याने महसूल कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षांची धुरा महसूल विभागावर असते. या संवर्गातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची यासाठी मोठ्या सांख्येने नेमणूक करण्यात येते. परीक्षा काटेकोर शिस्तीत घेण्यात येत असल्याने आंदोलन असताना ही परीक्षा घेणे अशक्य आहे. १५ जुलैपासून सुरू असलेल्या या आंदोलनाची शासनाने अजूनही गंभीर दखल घेतली नसल्याचे चित्र आहे. अजूनही राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी यांना चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आले नाही. शनिवार आणि रविवारी सुट्टी आली आहे. यामुळे चार दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन तूर्तास मिटण्याची चिन्हे नाहीत. अशा स्थितीत २१ तारखेला परीक्षा घेणे अशक्यप्राय ठरते.

विधान परिषद निवडणूक, आषाढी यात्रा, मराठा व ओबीसी संघर्ष, मनोज जरांगे पाटील यांचे प्रस्तावित आंदोलन, संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार यात शासन व्यस्त होते आणि आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpsc hit by work stoppage movement joint pre exam when now scm 61 ssb
Show comments