नागपूर: चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत हजारो पदांची भरती सुरू आहे. यासाठी अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात काढण्यात आली असून पदभरतीचा तपशील देण्यात आला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक आणि लिपिक-टंकलेखक पदे भरली जाणार आहेत. याअंतर्गत एकूण ७ हजार ५१० पदे भरली जातील. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. राज्य उत्पादन शुल्क गृह विभागात दुय्यम निरीक्षकची ६ पदे भरली जाणार आहेत. यासाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ३२ हजार ते १ लाख १ हजार ६०० रुपये पगार दिला जाईल. तांत्रिक सहाय्यकचे १ पद भरले जाणार असून यासाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २९ हजार २०० ते ९२ हजार ३०० रुपये पगार दिला जाईल.
हेही वाचा – जागा मिळवण्यासाठी दोन दिवस आधीच भाविक सभामंडपात! कोण आहे पंडित प्रदीप मिश्रा?
हेही वाचा – सोन्याचे दर पुन्हा घसरले, आजचे दर पहा…
कर सहाय्यकच्या ४६८ जागा भरल्या जाणार असून पदवीधर उमेदवार आणि मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. असलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २५ हजार ५०० ते ८१ हजार १०० रुपये पगार दिला जाईल. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून ५४४ रुपये, तर मागासवर्गीय उमेदवारांकडून ३४४ रुपये शुल्क घेण्यात येईल. उमेदवारांना संपूर्ण महाराष्ट्रात नोकरीचे ठिकाण मिळू शकेल. या रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया १७ ऑक्टोबरपासून सुरू झाली. उमेदवार ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत अर्ज करू शकतात. या पदांसाठी मुख्य परीक्षा १७ डिसेंबर रोजी घेतली जाणार आहे. उमेदवारांना अमरावती, छ. संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये परीक्षा केंद्र दिले जाणार आहेत.