अमरावती : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) विविध पदांच्या मुख्य परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करतानाच सरळ सेवेने भरावयाच्या ६६ पदांसाठी अर्ज नोंदणीचीही प्रक्रिया सुरू केली आहे. २१ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान उमेदवारांना ही नोंदणी करता येऊ शकेल. आयोगाच्या संकेतस्थळावर या पदभरतीसंदर्भात माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पूर्व परीक्षेनंतर आता मुख्य परीक्षा ३० सप्टेंबर ते ९ ऑक्टोबरपर्यंत घेण्यात येईल. याचा निकाल जानेवारी २०२४ मध्ये लागेल. अभियात्रिकी सेवा मुख्य परीक्षा १४ ऑक्टोबर, कृषी सेवा मुख्य परीक्षा १५ ऑक्टोबर, सहायक नियंत्रक वैधमापनशास्त्र मुख्य २१ ऑक्टोबर, सहायक कार्यकारी अभियंता गट-अ स्थापत्य १४ ऑक्टोबर, महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा १५ ऑक्टोबर आणि अन्न व औषधी प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २८ ऑक्टोबरला होईल.
हेही वाचा – वर्धा : खडतर शस्त्रक्रिया! लसिका ग्रंथींचे हत्तीपायावर यशस्वी प्रत्यारोपण
राज्य लोकसेवा, अभियांत्रिकी सेवा, कृषी सेवा, सहायक नियंत्रक वैधमापन शास्त्र, सहायक कार्यकारी अभियंता, अन्न व औषधी प्रशासकीय सेवा आदी भरती परीक्षांचा यात समावेश आहे. महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा ही ४ ते ७ नोव्हेंबर २०२३ दरम्यान होणार आहे. या सर्व परीक्षांचे निकाल डिसेंबरमध्ये जाहीर करण्यात येणार आहे.
हेही वाचा – पूर्व विदर्भात हिवतापाचा धोका वाढला, ऑगस्ट महिन्यात रोज सुमारे ३१ रुग्णांची नोंद
शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत सहायक संचालक, गट-ब व उपअभिरक्षक, पुरातत्व वस्तुसंग्रहालय संचालनालय या संवर्गातील तीन पदांसाठी, नियोजन विभागाअंतर्गत सहसंचालक व उपसंचालक गट-अ, अर्थ व सांख्यिकी संचालनालय या संवर्गातील ३८ पदांसाठी, विधी व न्याय विभागाअंतर्गत सहायक प्रारूपकार आणि अवर सचिव गट-अ ३ पदांसाठी, सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी व सामान्य राज्यसेवा गट-अ दोन पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत शासकीय औषधनिर्माण महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, तंत्रशिक्षण मंडळात सहसंचालक व सहायक सचिव या पदांसाठी भरती होणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या इच्छूक उमेदवारांनी २१ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालवधीत संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.