नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या लिपिक-टंकलेखक, कर सहायक या पदांच्या भरतीचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर आता उमेदवारांचे संपूर्ण लक्ष हे टंकलेखन कौशल्य चाचणीचीकडे होते. एमपीएससीने आता कौशल्य चाचणीची तारीख जाहीर केली आहे. यानुसार १ ते १३ जुलै दरम्यान ही कौशल्य चाचणी होणार आहे. यामुळे उमेदवारांना आता कसून तयारी करावी लागणार आहे.
आता लिपिक-टंकलेखक आणि कर सहाय्यक या पदांसाठी संगणक प्रणालीवर आधारित टंकलेखन कौशल्य चाचणी घेतली जाईल. टंकलेखन कौशल्य चाचणी ही केवळ पात्रता स्वरुपाची असेल. लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे संबंधित संवर्गात भरल्या जाणाऱ्या पदांच्या तिप्पट उमेदवार टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरतील. लिपिक-टंकलेखन संवर्गासाठी मुख्य परीक्षेसाठी अर्ज करताना उमेदवार मराठी किंवा इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी निवडू शकतात. उमेदवारांनी निवडलेल्या मराठी किंवा इंग्रजी टंकलेखन कौशल्याची चाचणी आयोगाकडून घेतली जाईल आणि त्या परीक्षेत पात्र होणे आवश्यक आहे. तसेच कर सहाय्यक संवर्गातील उमेदवारांना मराठी आणि इंग्रजी दोन्ही कौशल्य चाचणीमध्ये पात्रता असणे आवश्यक आहे.
हेही वाचा – ताटातूट झाल्याने अस्वस्थ असलेल्या मादी बिबट्यानं अखेर बछड्यास ताब्यात घेऊन…
टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी नवी कार्यपद्धत
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) लिपिक टंकलेखक, कर सहायक या टंकलेखन आवश्यक असलेल्या पदांच्या परीक्षांसाठी नवी कार्यपद्धती जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार लिपिक टंकलेखक पदाच्या भरतीमध्ये मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांना मराठी किंवा इंग्रजी यापैकी एक टंकलेखन कौशल्य चाचणी निवडता येणार असून, कर सहायक पदासाठी दोन्ही भाषांतील टंकलेखन कौशल्य चाचण्या द्याव्या लागणार आहेत. दोन्ही पदांसाठी टंकलेखन कौशल्य चाचणी अर्हताकारी स्वरुपाची करण्यात आली आहे. एमपीएससीने या संदर्भातील माहिती परिपत्रकाद्वारे दिली.
लिपिक टंकलेखक, कर सहायक या पदांच्या सेवा प्रवेश नियमांतील तरतुदी आणि अन्य बाबींचा साकल्याने विचार करून कार्यपद्धती जाहीर करण्यात आली. त्यानुसार लिपिक टंकलेखक, कर सहायक पदासाठीच्या पदभरतीमध्ये संगणक प्रणालीवर आधारित टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षेच्या आधारे संबंधित पदांसाठी भरल्या जाणाऱ्या पदांच्या तीन पट उमेदवार टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरवले जातील. ही कार्यपद्धत या पुढे होणाऱ्या टंकलेखन कौशल्य चाचणीला लागू असेल, असे स्पष्ट करण्यात आले.