नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब या पदांच्या परीक्षांना सुधारित आरक्षण निश्चितीसाठी स्थगिती देण्यात आली होती. परीक्षा लांबल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रकाशित केल्यावर आयोगाने याची दखल घेत सुधारित जाहीरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार १८ ऑगस्टला परीक्षा घेण्यात आली. समाज कल्याण अधिकारी, गट-ब या परीक्षेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून कुठल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार याची माहिती देण्यात आली आहे. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘एमपीएससी’ने मे २०२३ मध्ये समाज कल्याण विभागातील विविध पदांसाठी जाहिरात दिली होती. राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज केले आहेत. ‘लोकसत्ता’ने सातत्याने हा विषय लावून धरल्यानंतर आयोगाने अभ्यासक्रम आणि परीक्षेची तारीख जाहीर केली. त्यानुसार १९ मे रोजी समाज कल्याण अधिकारी गट ‘ब’ या पदासाठी परीक्षा होणार होती. मात्र, आयोगाने सुधारित आरक्षणनिश्चिती प्राप्त झाल्यानंतरच परीक्षांबाबत घोषणा केली जाईल, असे सांगत ही परीक्षा स्थगित केली. ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४’ ही परीक्षाही स्थगित करण्यात आली होती. मात्र, मराठा आरक्षणानुसार नवीन आरक्षण निश्चिती करून आयोगाने नागरी सेवा परीक्षेची सुधारित तारीख जाहीर केली. परंतु, समाज कल्याण विभागातील विविध पदे आणि अन्य विभागांच्या परीक्षांची तारीख जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. लोकसत्ताने याविषयाला वाचा फोडल्यावर आयोगाने याची दखल घेत शुद्धीपत्र जाहीर केले होते. त्यानुसार १८ ऑगस्टला परीक्षा घेण्यात आली असून आधी खुल्या वर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना आता सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या आरक्षणानुसार अर्ज करण्याची संधीही देण्यात आली होती. ‘एमपीएससी’ने मे २०२३ मध्ये समाज कल्याण विभागातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व संबंधित गट अ, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग ४१, समाज कल्याण अधिकारी, गट ब, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग २२, गृह प्रमुख, गट ब, समाज कल्याण आयुक्तालय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील १८ अशा विविध पदांसाठी जाहिरात दिली होती. राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज केले होते.

हेही वाचा : पालकमंत्री वाटपाचा घोळ दोन दिवसात संपणार, बावनकुळेंचे संकेत

तर मुलाखतीसाठी अपात्र ठरणार

न्यायिक प्रकरणावरील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधिन राहून आयोगाच्या संकेतस्थळावर समाज कल्याण अधिकारी गट ब परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निकालात प्रथमदर्शनी पात्र ठरलेल्या उमेदवारांची छाननीअंती पात्रता तपासल्यानंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीस बोलावले जाईल. जाहिरातीमधील तरतुदीनुसार विविध दावे तपासताना वा अन्य कारणामुळे अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल असे आयोगाने स्पष्ट केले आहे. तसेच मुलाखतीचा कार्यक्रम स्वतंत्ररित्या जाहीर केला जाणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpsc social welfare officer post result announced this candidates get interview opportunity dag 87 css