नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३, मधील लिपिक टंकलेखक व करसहायक या संवर्गाची ‘टंकलेखन कौशल्य चाचणी’ परीक्षेत पहिल्याच दिवशी तांत्रिक गोंधळ उडाल्याने १ ते ३ जुलैपर्यंतची परीक्षा रद्द करण्यात आली. राज्यभरातील विद्यार्थ्यांना मुंबई हे एकच परीक्षा केंद्र दिल्याने मुंबईबाहेरून आलेल्या उमेदवारांमध्ये ‘एमपीएससी’ विरोधात प्रचंड संतापाची लाट आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयोगाने लिपिक-टंकलेखक व करसहायक या पदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी १ ते १३ जुलै दरम्यान मुंबई येथील विविध परीक्षा केंद्रांवर होईल असे जाहीर केले. त्यानुसार सकाळी मुंबई येथील परीक्षा केंद्रावर टंकलेखन परीक्षेला सुरुवात झाली. परीक्षेदरम्यान टंकेलेखन करताना ‘कन्ट्रोल आणि शिप्ट’चे बटन दाबले की संगणक बंद पडत होता. किंवा काही उमेदवारांना परीक्षेतून बाहेर पडावे लागत होते. टीसीएस कंपनीकडे हे काम असून त्यांनी काहीवेळ हा तांत्रिक गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश न आल्याने उमेदवारांचा संताप वाढत गेला. शेवटी ‘एमपीएससी’च्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी १ ते ३ जुलैपर्यंतची परीक्षा रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले.

हेही वाचा – “बळजबरीने जमिनी घ्याल तर रक्ताचे पाट वाहतील,” भक्ती मार्गावरून रविकांत तुपकर आक्रमक; म्हणाले…

‘एमपीएससी’तर्फे सप्टेंबर २०२३ मध्ये गट-क सेवा पदाच्या ७ हजार ५१० जागांसाठी जाहिरात देण्यात आली. त्यानंतर मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर आणि अमरावती अशा सहा केंद्रांवर मुख्य परीक्षा २०२३ घेण्यात आली. यानंतर टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. आयोगाने लिपिक-टंकलेखक व करसहायक या पदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी १ ते १३ जुलै दरम्यान केवळ मुंबई येथील विविध परीक्षा केंद्रांवर होईल असे जाहीर केले. त्यामुळे गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरपासून सर्वच उमेदवारांना मुंबई केंद्रावर जावे लागणार आहे. अनेक उमेदवार दुर्गम भागातील असून बिकट आर्थिक परिस्थितीत परीक्षा देतात. अशा कुठल्याही परस्थितीचा विचार न करता मुंबईला परीक्षा होणार असल्याने त्यांच्यावर मानसिक तसेच आर्थिक ताण आला आहे. त्यात आता १ ते ३ जुलैपर्यंत होणारी परीक्षा तांत्रिक गोंधळाने रद्द झाल्याने या सर्व उमेदवारांची कोंडी झाली आहे.

‘एमपीएससी’ने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ मांडला आहे. अन्य ठिकाणी सॉप्टवेअर नाही म्हणून मुंबईला परीक्षा घेतो असे आयोग सांगतो. राज्यभरातील विद्यार्थ्यांना आर्थिक, मानसिक त्रास देऊन मुंबईला परीक्षेसाठी बोलावले जाते. त्यानंतर पहिल्याच दिवशी गोंधळ निर्माण होतो. ही आयोगाच्या चुकांची सीमा झाली आहे. त्यामुळे सरकारने याची गंभीर दखल घेत सर्व विद्यार्थ्यांना आर्थिक नुकसान भरवाई द्यावी. – उमेश कोर्राम, स्टुटंट्स राईट्स असोसिएशन.

हेही वाचा – बुलढाणा: भक्तिमार्गाविरोधात काँग्रेसचा ‘आत्मक्लेष’

सकाळपासून आम्ही परीक्षा केंद्रावर होतो. दुर्दैवाने काही तांत्रिक अडचणी आली आहेत. सायंकाळपर्यंत अडचण दूर होईल असे आश्वासन ‘टीसीएस’ कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिले. परंतु, अडचण दूर होऊन परीक्षा मार्गी लागाव्या यासाठी आम्ही खूप प्रयत्न केला. मात्र ते न झाल्याने आजची परीक्षा रद्द करण्यात आली. तसेच खबरदारी म्हणून ३ जुलैपर्यंतची परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय घेतला. – डॉ. सुवर्णा खरात, सचिव एमपीएससी.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpsc typewriting exam canceled due to technical glitch a wave of anger among the candidates dag 87 ssb