नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) अखेर राज्यसेवा २०२५ पासून मुख्य परीक्षा ही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. दोन वर्षांपूर्वी वर्णनात्मक पद्धत लागू करण्यास ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांचा प्रचंड विरोध झाला होता. त्यानंतर आयोगाने आता राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली असून वर्णनात्मक पद्धतीने मुख्य परीक्षा होणार असे प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे.

आयोगाने यंदा २०२५ पासून राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी वर्णनात्मक पद्धत लागू करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. त्यासाठी राज्यातील लाखो विद्यार्थी मुंबई, पुणे, नागपूर अशा विविध शहरांमध्ये राज्यसेवा परीक्षेची नव्या पद्धतीनुसार तयारी करतात. आयोगाच्या अंदाजित वेळापत्रकानुसार राज्यसेवेची जाहिरात ही जानेवारी महिन्यात येणे अपेक्षित होते. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून विद्यार्थी सातत्याने या परीक्षेच्या जाहिरातीची चातकाप्रमाणे वाट बघत होते. अखेर विविध संवर्गातील एकूण ३८५ जागांसाठी ही जाहिरात असून नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा २०२५ ही २८ सप्टेंबरला होणार आहे. राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. राज्यसेवा परीक्षा यूपीएससीच्या धर्तीवरच वर्णनात्मक पद्धतीने होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता नवीन आव्हानांना समोर जावे लागणार आहे.

वर्णनात्मक परीक्षा कशी घेतली जाईल?

राज्यसेवा पूर्वपरीक्षेतील प्रश्नपत्रिका क्रमांक दोन अर्थात ‘सी सॅट’ हा विषय केवळ पात्रतेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. तर सुधारित पद्धतीत वर्णनात्मक स्वरूपाच्या नऊ प्रश्नपत्रिका असतील. त्यापैकी मराठी आणि इंग्रजी भाषेच्या प्रश्नपत्रिका प्रत्येकी ३०० गुणांच्या असतील. मराठी किंवा इंग्रजी निबंधाची एक, सामान्य अध्ययनाच्या एकूण चार, वैकल्पिक विषयांच्या दोन अशा एकूण सात प्रश्नपत्रिका प्रत्येकी २५० गुणांसाठी असतील.

संयुक्त परीक्षेत अला बदल राहणार

राज्यसेवेसह सर्व राजपत्रित गट-अ आणि गट- ब संवर्गासाठी महाराष्ट्र संयुक्त पूर्वपरीक्षा या नावाने एकच पूर्वपरीक्षा होईल. परीक्षेचा अर्ज भरताना उमेदवारांना त्यांचा पसंतीक्रम द्यावा लागेल आणि त्यानुसार अर्ज भरावा लागेल. जितके अर्ज पूर्वपरीक्षेला आले असतील त्यानुसार मुख्य परीक्षेतील उमेदवारांची संख्या निश्चित करण्यात येईल व पूर्वपरीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल. निकाल जाहीर झाल्यावर मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची संबंधित संवर्गासाठी म्हणजेच राज्यसेवा पूर्वपरीक्षा, स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य सेवा, कृषी सेवा मुख्य परीक्षा आदी वेगवेगळ्या पदांसाठी स्वतंत्र परीक्षा घेण्यात येतील.