नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्थापत्य अभियांत्रिकीच्या ३६०० पदांच्या मुलाखती न्यायालयाच्या प्रक्रियेमुळे रखडल्या असून या मुलाखती घेण्यासाठी न्यायालयाने आम्हाला त्वरित परवानगी द्यावी, अशी विनंती आयोगाच्या वकिलाकडून न्यायालयात केली जाणार असल्याची माहिती एमपीएससीकडून देण्यात आली आहे. ‘एमपीएससी’च्या वेळकाढूपणामुळे मुलाखती रखडल्याच्या ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर ‘एमपीएससी’च्या सदस्यांकडून ट्विटरवर हा खुलासा करण्यात आला आहे.

स्थापत्य अभियांत्रिकीच्या ११४५ जागांसाठी सुरुवातीला ३६०० उमेदवारांची निवड करण्यात आली होती. ५ जुलैच्या शासन निर्णयानुसार या ११४५ जागांमध्ये एसईबीसी प्रवर्गासाठी असलेल्या १३ टक्के जागा खुल्या वर्गामध्ये रूपांतरित करण्यात आल्या. यानंतर ईडब्ल्यूएस प्रवर्गातील कमी गुण असणारे काही उमेदवार वगळले गेले. यातील एका उमेदवाराने मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुधारित यादीला आवाहन देणारी याचिका  केली. याशिवाय अन्य विभागातील ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांनीही मुंबई उच्च न्यायालयात याच धर्तीवर याचिका दाखल केल्या आहेत. त्यामुळे न्यायालयाने महावितरण, एमपीएससी आणि अन्य विभागातील याचिका एकत्रित केल्या. त्यामुळे एमपीएससीच्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या मुलाखती रखडल्याचे आयोगाने स्पष्ट केले.  एमपीएससीच्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या पदांच्या मुलाखती या तातडीने घेणे आवश्यक असून त्यासाठी न्यायालयाने परवानगी द्यावी, अशी विनंती केली जाणार आहे. ‘एमपीएससी’ आज बाजू मांडणार एमपीएससीच्या वकिलामार्फत मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या याचिकेत सोमवारी मध्यस्थी केली जाणार आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालय आणि राज्य शासनाच्या ५ जुलैच्या शासन निर्णयाचा दाखला देत या पदांची मुलाखत घेण्यासाठी स्वतंत्र परवानगी द्यावी, अशी विनंती केली जाणार असल्याची माहिती आहे.

स्थापत्य अभियांत्रिकी पदाच्या मुलाखती लवकर व्हाव्या अशी काळजी आयोगालाही आहे. मात्र, न्यायालयात ईडब्ल्यूएस प्रवर्गातील काही विभागांच्या याचिका एकत्रित केल्याने उशीर झाला आहे. त्यामुळे आम्ही न्यायालयाला स्थापत्य अभियांत्रिकीच्या मुलाखती लवकर घेण्यासाठी स्वतंत्र परवानगी मागणार आहोत.– दयावान मेश्राम, सदस्य, एमपीएससी.