- नागपूरच्या ‘मेयो’सह इतर रुग्णालयांत उपकरणे कधी?
- दारिद्रय़ रेषेखालील रुग्णांनाही शुल्क आकारणी
राज्याची राजधानी असलेल्या ‘मुंबई’तील शासकीय रुग्णालयांच्या तुलनेत विदर्भातील रुग्णालयांत ‘एमआरआय’ या अद्ययावत तपासणी उपकरणाची वानवा असल्याचे चित्र आहे. मुंबईतील महापालिकेसह वैद्यकीय शिक्षण विभागातील शासकीय रुग्णालयांत सर्वत्र ‘एमआरआय’ उपलब्ध असताना विदर्भातील केवळ नागपूरचे मेडिकल वगळता इतरत्र हे उपकरण नाही. त्यातच मुंबईत ‘बीपीएल’ रुग्णांना ‘एमआरआय’करिता अधिष्ठात्यांच्या स्वप्रपंच खात्यातून पैसे देऊन मोफत तपासणीची सोय असतांना नागपूरला मात्र गरिबांकडूनही पैसे घेतले जात आहेत.
महाराष्ट्राच्या इतर भागाच्या तुलनेत मराठवाडा व विदर्भावर नेहमीच अन्याय झाल्याचे गेल्या अनेक वर्षांचे राज्याचे ताळेबंद तपासले असता दिसून येते. शासनाकडून सिंचनासह इतर विकासात्मक कामांकरिता राज्याच्या इतर भागाच्या तुलनेत विदर्भाला फार कमी निधी दिला आहे. हा अन्याय आरोग्य विभागाच्या बाबतीतही झाला आहे. त्याचा एक भाग म्हणजे मुंबईच्या तुलनेत विदर्भातील शासकीय रुग्णालयांपैकी केवळ मेडिकलमध्ये रुग्णांच्या तपासणीकरिता ‘एमआरआय’ची सोय उपलब्ध आहे. भाजपने विदर्भातील नागरिकांना स्वतंत्र विदर्भासह ‘अच्छे दिना’चे स्वप्न दाखवत महाराष्ट्रासह देशात सत्ता मिळवली. येथील नागरिकांनी भाजपला भरभरून मतदान दिले. नवीन सरकारकडून नागरिकांना चांगल्या अपेक्षा होती. परंतु सत्तापरिवर्तनाला दोन वर्षांहून जास्त कालावधी लोटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारलाही विदर्भातील शासकीय रुग्णालयांतील स्थिती सुधारता आली नाही. राज्यात वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आखत्यारित्या येणाऱ्या रुग्णालयांपैकी मुंबईच्या जेजे रुग्णालयांत दोन, पुणे, औरंगाबाद, नागपूरच्या मेडिकलसह इतर काही संस्थांमध्ये प्रत्येकी एक ‘एमआरआय’ उपकरण उपलब्ध आहे. शासनाने गेल्या अनेक वर्षांपासून मागणी केल्यावरही नागपूरच्या मेयोसह वैद्यकीय शिक्षण विभागाच्या यवतमाळ, अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत अद्याप हे यंत्र उपलब्ध केले नाही.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आखत्यारीत असलेल्या अमरावतीच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयासह विदर्भातील एकाही जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयांत हे उपकरण उपलब्ध नाही. त्या तुलनेत मुंबईतील महापालिकेच्या आखत्यारीत असलेल्या बहुतांश रुग्णालयांतही हे उपकरण उपलब्ध आहे. तेव्हा ‘एमआरआय’ उपकरणाच्या बाबतीतही विदर्भातील शासकीय रुग्णालयांवर अन्याय झाल्याचे चित्र आहे. मुंबईच्या जेजे रुग्णालयांत दोन ‘एमआरआय’ असून तेथे सामान्य रुग्णांकरिता एक व ‘व्हीआयपी’ रुग्णांकरिता एक उपकरण वापरल्या जाते. मुंबईला जेजे रुग्णालयांत उपचार घेणाऱ्यांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसह इतर वेगवेगळ्या विभागातील वरिष्ठांचा समावेश असल्याने हा चमत्कार झाल्याचे बोलले जाते. तेव्हा नागपूरच्या मेयो व मेडिकलसह विदर्भातील सगळ्याच शासकीय रुग्णालयांत उच्च गटासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही आवर्जुन उपचार घ्यावा म्हणून ‘एमआरआय’ उपलब्ध होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) विदर्भासह शेजारच्या दोन राज्यांतून मोठय़ा संख्येने रुग्ण उपचाराकरिता येतात. बऱ्याच रुग्णांना उपचाराची अचूक दिशा ठरवण्याकरिता ‘एमआरआय’ची गरज असते. मुंबईच्या जेजे रुग्णालयात दोन एमआरआय असले, तरी मेयोत एमआरआय उपलब्ध व्हावे म्हणून प्रयत्न केले जातील. त्याकरिता प्रशासनाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मदत घेतली जाईल.
– डॉ. मिनाक्षी वाहाने-गजभिये अधिष्ठाता, मेयो, नागपूर