नागपूर : एसटी महामंडळातून निवृत्त कर्मचाऱ्यांना एसटीच्या साध्या बसमधून प्रत्येक वर्षी मोफत प्रवासासाठी पास मिळतो. आता त्यांना स्लिपर कोच बसमध्येही प्रवास करता येईल. परंतु, त्यासाठी भाड्याच्या फरकाची रक्कम भरावी लागेल. याशिवाय निवृत्तीनंतर दगावलेल्या कर्मचाऱ्याच्या पत्नी वा पतीलाही वयाच्या ७५ वर्षांपर्यंत पासची सुविधा मिळणार आहे. एसटी महामंडळाने हे निर्णय घेतले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रत्येक वर्षी एसटीतून मोठ्या संख्येने अधिकारी- कर्मचारी निवृत्त होतात. त्यांना वयाच्या ७५ वर्षांपर्यंत प्रत्येक वर्षी जुलै ते फेब्रुवारी या कालावधीदरम्यान एकदा मोफत प्रवासाचा पास मिळतो.

हेही वाचा…ॲड. प्रकाश आंबेडकरांकडे एकही वाहन नाही, कर्ज नाही; जंगम व स्थावर मालमत्तेत मात्र…

पूर्वी निवृत्त कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी वा पतीला वयाच्या ६५ वर्षांपर्यंतच पास मिळायचा. परंतु आता जिवंत कर्मचाऱ्यांप्रमाणेच मृत कर्मचाऱ्याच्या पत्नी वा पतीलाही वयाच्या ७५ वर्षांपर्यंत पास मिळेल. पूर्वी एसटीच्या पासवर साध्या बसमध्येच प्रवास करता येत होता. परंतु आता महामंडळाने शिवशाहीच्या स्लिपर, शिवनेरीसह इतर सगळ्या लक्झरी बसमध्ये फरकाची रक्कम भरून प्रवासाची मुभा दिली आहे. या निर्णयाचा राज्यातील ४० हजारांहून जास्त निवृत्त कर्मचारी वा त्याच्या कुटुंबीयांना लाभ होणार आहे.

हेही वाचा…लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वीज दरवाढीचा ‘शॉक’!

वर्षभराचा पास द्या

“मोफत पास सहा महिन्यांसाठीच मिळते. परंतु असा पास सहा महिन्यांऐवजी वर्षभर देण्याची आमची मागणी आहे.” – अजय हट्टेवार, राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Msrtc extends free travel facility to retired employees spouses mnb 82 psg