भंडारा: आपण आजवर खाद्य महोत्सव पाहिला असेल, नाट्य महोत्सव पहिला असेल जास्तीत जास्त काय चित्रपट महोत्सव पहिला असेल पण आपण कधी ‘चिखल महोत्सव’ पाहिला आहे का? नाही ना! हो भंडारा तालुक्यातील ठाणा पेट्रोल पंप येथील आदर्श इंग्रजी माध्यम विद्यालयात चक्क चिखल महोत्सव रंगला होता. आपल्या मातीशी नाळ जोडणारा, मातीच्या मायेची उब देणारा असा हा आगळा वेगळा चिखल महोत्सव सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला.
सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात लहान मुलं मोबाईल लॅपटॉपच्या दुनियेत रमतात. प्रत्यक्ष मैदानात येऊन खेळण्याचा संबंध खूपच कमी झाला आहे. मोबाईल आल्याने लहान मुलं देखील दिवस – दिवसभर मोबाईल हातातून सोडत नाहीत यामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास खुंटत चाललेला आहे. पालकांची हिच चिंता लक्षात घेता भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर परिसरातील ठाणा पेट्रोल पंप येथील आदर्श इंग्रजी माध्यम विद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी एका अनोख्या चिखल महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवात विद्यार्थ्यांसह शिक्षकानीही चिखलात माखून घेत आनंद लुटला.
हेही वाचा… मरावे परी कीर्तिरुपी उरावे! मेंदूमृत तरुणाच्या अवयवदानातून तिघांना नवजीवन
चिखलात हात घालायचं म्हटलं किंवा अंगाला चिखल लागलं तरी अलीकडे नको नको वाटतं. मात्र, पावसाळ्यातील खेळ मागे पडत चालले आहेत. हाच धागा पकडत आदर्श इंग्लिश विद्यालयानं जवळच असलेल्या चरडे यांच्या शेतात चिखल महोत्सव दणक्यात साजरा केला. यावेळी
डोक्यापासून पायापर्यंत सर्वजण चिखलानं माखलेले दिसले. विद्यार्थी एकमेकांना न ओळखताही खेळात दंग झाले होते. अभ्यासाच्या दुनियेतील एका वेगळ्या दुनियेचा मनमुराद आनंद प्रत्येक विद्यार्थ्यांनी लुटला. आम्ही असं खेळलो नव्हतो. चिखलात खेळल्याने खूप आनंद झाला. नैसर्गिक माती शरीराला रोमांचित करून गेली, असे एक विद्यार्थिनी म्हणाली तर बारावीतील तेजस हटवार याने असा प्रयोग प्रत्येक शाळा, महाविद्यालयांमध्ये राबवावा, अशी भावना व्यक्त केली. या महोत्सवात साधारण २५० विद्यार्थ्यांनी चिखलात मनसोक्त आनंद लुटला.
विद्यार्थी जुळले मातीशी
इंटरनॅशनल शाळांमध्ये मड बॉथ ही संकल्पना राबवली जाते. ही संकल्पना खर तर या चिखल महोत्सवातून शाळा संचालकांनी विद्यार्थ्यांसमोर आणली. दहावी, बारावीचे विद्यार्थी चिखल महोत्सवात सहभागी झाले होते. पायाला माती लागली पाहिजे. यातून शरीराला ऊर्जा प्रदान होत असते. हे या चिखल महोत्सवामागचे शास्त्रीय कारण आहे. रोवणी संपली की, चिखलातून धावण्याची स्पर्धा आधी घेतली जायची. आता अशा महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थी पुन्हा मातीशी जोडले जात आहेत.
विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही लुटला आनंद
चिखल महोत्सवाचं उद्घाटन शाळेचे विद्यालयाचे संचालक शिलवंत रंगारी यांच्या हस्ते करण्यात आलं. औपचारिक उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर विद्यार्थी – विद्यार्थिनींनी चिखलामध्ये मनसोक्त खेळण्याचा आनंद लुटला. विद्यार्थ्यांनी संगीताच्या तालावर चिखलात नृत्य केलं, रस्सीखेच, फुटबॉल यासारखे खेळ खेळले. या महोत्सवात विद्यार्थ्यांसोबत सर्व शिक्षकांनीदेखील चिखलात खेळण्याचा आनंद लुटला