नागपूर : गेल्या काही महिन्यांपासून सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या शक्कल लढवून अनेकांची फसवणूक करीत आहेत. मात्र, आता ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ला सायबर गुन्हेगारांनी टार्गेट केले आहे. अर्जाची लिंक पाठवून माहिती भरण्यास सांगितल्या जात असून बँक खाते रिकामे केले जात असल्याचे काही प्रकार समोर आले आहे.
सध्या राज्यात ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने’चे वारे सुरु आहे. अनेक महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करीत आहेत. अनेकींनी माहेरी जाऊन कागदपत्र गोळा केले आहेत. अर्ज भरण्यासाठी शासकीय केंद्रावर महिलांची गर्दी उसळत आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर काही दिवसांतच अनेक महिलांनी ‘ऑनलाईन’ आणि ‘ऑफलाईन’ अर्ज भरला. मात्र, बऱ्याच महिलांचे अर्ज अजुनही ‘पेंडिंग’ दाखवत आहेत तर अनेक महिलांनी अद्याप अर्ज भरला नाही. अशा महिला अर्ज भरण्यासाठी धावपळ करीत आहेत.
हेही वाचा >>> राज्यात विजेच्या मागणीत ३ हजार मेगावॉटची वाढ; पावसाने उसंत घेतल्याने…
महिलांच्या याच स्थितीचा गैरफायदा सायबर गुन्हेगारांनी उचलला असून फेसबुक, इंस्टाग्राम, टेलीग्राम आणि व्हॉट्सअॅपवर‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’च्या नावावर बनावट लिंक, संकेतस्थळ टाकत आहेत. त्या लिंकमधील अर्जात महिलांची माहिती भरण्यास सांगण्यात येत आहेत. बँक खात्याचा तपशील मिळाल्यानंतर सायबर गुन्हेगार महिलांच्या खात्यातून परस्पर पैसे काढून फसवणूक करीत असल्याच्या अनेक तक्रारी राज्यभरातून समोर आल्या आहेत. लिंकवर क्लिक केल्यानंतर सायबर गुन्हेगारांकडे सर्वच माहिती जात असून अन्य फसवणुकीसाठी अर्जातील माहितीचा गैरवापर करण्यात येत आहे.
हेही वाचा >>> वर्धा : स्वातंत्र्यदिनाची सुट्टी बेतली जीवावर; दोन बुडाले, तर एक बचावला…
खात्यात पैसे टाकण्याचे आमिष
समाजमाध्यमांवर लिंक टाकून सायबर गुन्हेगार मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे अर्ज भरण्यास प्रोत्साहन देत आहेत. त्यात मुख्यमंत्र्यांच्या छायाचित्राचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांचा लिंकवरील अर्जावर विश्वास बसतो. अर्ज भरल्यानंतर बँक खात्यात पैसे टाकण्याचे आमिष सायबर गुन्हेगार देतात. त्या आमिषाला अनेक महिला बळी पडतात. बँक खात्यातून असलेली रक्कम परस्पर लंपास केली जाते.
‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ किंवा अन्य शासकीय योजनेसंदर्भात सायबर गुन्हेगार बनावट संकेतस्थळ आणि बनावट लिंक समाजमाध्यमांवर प्रसारित करीत आहेत. अशा लिंक आणि संकेतस्थळापासून सावध राहा. कुणाची फसवणूक झाल्यास सायबर पोलीस ठाण्यात तक्रार करा. – अमित डोळस, ठाणेदार, साबयर पोलीस ठाणे, नागपूर.