नागपूर : राज्य शासनाने नुकतीच ’मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण’ ही योजना जाहीर केली आहे. त्याव्दारे महिलांना दर महिन्याला १५०० रुपये अनुदान मिळणार आहे. शासनाने जाहीर केलेल्या योजनेत २१ ते ६५ वयोगाटाती महिला पात्र आहेत. त्यासाठी वयाचा दाखला आवश्यक आहे. अर्जासोबत जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला जोडावा लागणार आहे. तो मिळवण्यासाठी अनेक विवाहित महिलांनी माहेरची वाट धरली आहे. नागपूर जिल्ह्यात महिलांची लोकसंख्या सरासरी १२ लाखांवर आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विवाहानंतर वेगवेगळ्या जिल्ह्यात गावात, शहरात राहू लागल्या आहेत. या योजनेचा लाभ पदरी पडावा म्हणून अनेक पात्र महिलांनी महिलांनी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली आहे.
हेही वाचा >>> ‘वासनातूरा न भयम न लज्जाम’… काकाचा अल्पवयीन पुतणीवर शारीरिक अत्याचार, बुलढाणा जिल्ह्यातील घटना
अनेकींकडे त्यांच्या जन्माचा दाखला नाही, मात्र शालेय शिक्षण घेतले असल्याने तो तेथून शाळा उपलब्ध होऊ शकतो. ही बाब विचारात घेऊन महिला आता माहेरी जावून त्या ज्या शाळेची दारे ठोठावू लागल्या आहेत. ’मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण’ योजनेच्या निमित्ताने का होईना पण अनेक वर्ष कुटुंबाच्या जबाबदारीमुळे माहेरी जाऊ न शकलेल्या महिलांना माहेरी जाण्याची संधी प्राप्त झाली आहे.विशेषत: चाळीशी किंवा पन्नाशी ओलांडलेल्या महिलांचे संसारिक जबाबदारीमुळे माहेरी जाणे कमी झाले होते. गावही तुटले होते. मात्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे त्यांना माहेरची आठवण झाली आहे. नागपूर ग्रामीणमध्ये अनेक गावात हे चित्र पाहायला मिळते. यानिमित्ताने जावई सुद्धा सासूरवाडीला भेट देत आहे. नातेवाईकांच्या गाठीभेटी घेत आहे.
हेही वाचा >>> नागपूर महापालिका शाळांमधील विद्यार्थी संख्येत घसरण, विधान परिषदेत काय म्हणाले दटके ..
एखादी योजना किती परिणामकारक ठरू शकते हे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून दिसून येत आहे. शहरातही कागदपत्र मिळवण्यासाठी महिला सेतू केंद्रात गर्दी करीत आहे. योजनेत नाव नोंदणीसाठी पूर्वी १५ जुलैपर्यंतच मुदत होती. ती आता दोन महिन्यापर्यंत वाढवण्यात आली आहे. जन्माचा दाखला किंवा शाळेतून शाळा सोडल्याचा दाखला मिळवणे अवघड आहे. अनेक शाळांकडे जुना रेकॉर्ड नाही, असेल तर तो सापडत नाही, अशा वेळी ग्रामपंचायती किंवा अन्य मार्ग तपासून पाहले जात आहे. ऐरवी विवाहित महिला दिवाळी किंवा विवाहसमारंभाच्या निमित्ताने माहेरी येतात. उन्हाळ्यात मुलांना सु्ट्या लागल्यावर मुक्कामी येतात. पण शाळा सुरू झाल्यानंतर त्यांचे माहेरला जाणे शक्य होत नाही. मात्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेने अनेक महिलांची पावले माहेरी वळू लागली आहे. पुढच्या काळात गावागावात हे चित्र दिसणार आहे. शासनाने महिलांना एस.टी. प्रवासात तिकीट दरात निम्मी सवलत दिली आहे. त्यामुळे गावाला जायचे असेल तर खर्चही कमी येत असल्याने महिलांची गर्दी वाढली आहे.