नागपूर : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी ‘मुख्यमंत्री योजनादूत’उपक्रम सुरु करण्यात आला आहे. राज्यात एकूण ५० हजार योजनादूत नेमण्यात येणार असून रविवार दुपारी १ वाजेपर्यंत राज्यात २५ हजार तर नागपूर विभागात १ हजार ७१९ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. ७ सप्टेंबर २०२४ पासून या उपक्रमासाठी नोंदणी सुरु झाली असून येत्या १३ सप्टेंबरपर्यंत ww.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.महाराष्ट्र शासनाच्या अनेक लोकोपयोगी योजना आहे. त्याची माहिती जनतेपर्यंत पोहचत नसल्याने अनेक गरजू त्यापासून वंचित राहतात. त्यांना या योजनांची माहिती देणे, त्यांना लाभ करून देण्यासाठी ही मुख्यमंत्री योजना दूत ही योजना राबवण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ‘मुख्यमंत्री योजनादूत’उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील.
हे ही वाचा…Video : लग्न मोडल्याच्या कारणावरून दोन कुटुंबात वाद; तलवारीने हल्ला अन् दगडफेक
नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये एकूण ५ हजार ३६९ योजनादूत नेमण्यात येणार असून विभागात ८ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेपर्यंत १ हजार ७१९ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. नागपूर जिल्ह्यात ४१७ उमेदवारांनी, भंडारा जिल्ह्यातील ३२८, चंद्रपूर जिल्ह्यातील ३९० ,गडचिरोली जिल्ह्यातील १८३ ,गोंदिया जिल्ह्यातील १५५ आणि वर्धा जिल्ह्यातील २४६ उमेदवारांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे.
असे आहेत निवडीचे निकष
या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.
हे ही वाचा…इसापूर धरणाचे सात दरवाजे उघडले; विदर्भ -मराठवाडा सीमेवरील गावांना सतर्कतेचा इशारा
ही कागदपत्रे आवश्यक
मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांना http://www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.