नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा गाजावाजा करत ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ सरकारने लागू केली. या योजनेअंतर्गत शासकीय, निमशासकीय आणि खासगी क्षेत्रातील विविध आस्थापनांवर हजारो प्रशिक्षणार्थी रुजूही झाले. मात्र, प्रशासकीय गोंधळामुळे प्रशिक्षणार्थींच्या खात्यांत विद्यावेतनाची दमडीही जमा झालेली नसल्याने बहुतांश ‘लाडक्या भावां’ची दिवाळी अंधारातच जाण्याची चिन्हे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोजगार इच्छुक युवक-युवती आणि आस्थापनांमध्ये संवाद व समन्वय साधून रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ तीन महिन्यांपूर्वी सुरू केली. यात बारावी उत्तीर्ण, आय.टी.आय., पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रताधारकांना प्रशिक्षणाअंती रोजगाराच्या संधी आणि विद्यावेतन मिळणार आहे. या योजनेंतर्गत ‘महास्वयम’ या संकेतस्थळावर ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही स्वरूपात प्राप्त झालेल्या माहितीनुसार या प्रशिक्षणार्थींना ऑगस्ट महिन्यात रुजू होण्याचे आदेश देण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत, पंचायत समिती आदी ठिकाणी प्रशिक्षणार्थी रुजू झाले. मात्र, त्यांचे विद्यावेतन अद्याप अदा करण्यात आले नाही. काही भागातील प्रशिक्षणार्थींच्या खात्यात विद्यावेतन जमा झाले आहे. मात्र, त्यांची संख्या अत्यंत कमी असून हजारो प्रशिक्षणार्थी विद्यावेतनापासून वंचितच आहेत.

हेही वाचा : महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटेंनी दिली वंचितच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी; पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल

प्रशिक्षणार्थींचे म्हणणं काय?

नागपूरच्या एका प्रशिक्षणार्थीने सांगितले, की जिल्ह्यातील एका महाविद्यालयात महिन्यांपासून तेथे सेवा देत आहे. व्हॉट्सअॅप ग्रुपवर हजेरी पत्रक मागितले. ते सादर केल्यानंतरही विद्यावेतन मिळालेले नाही. तर गेल्या आठवड्यात ‘महास्वयम’वर ऑनलाइन हजेरी पत्रक अपलोड करण्याचे आदेश दिले. आता पुन्हा मुख्याध्यापकाच्या सही-शिक्क्यासह केंद्रप्रमुखांकडे ऑफलाइन हजेरी पत्रक द्यायचे नवीन आदेश देण्यात आल्याची तक्रार जळगावच्या जिल्हा परिषद शाळेतील प्रशिक्षणार्थीने केली. भंडाऱ्यातील एका ग्रामपंचायत कार्यालयात रुजू झालेल्या प्रशिक्षणार्थीला २६ ते ३१ ऑगस्टदरम्यानचे विद्यावेतन मिळाले. मात्र सप्टेंबरपासूनची रक्कम जमा झाली नसल्याने दिवाळीच्या तोंडावर आर्थिक अडचण असल्याचे या प्रशिक्षणार्थीने सांगितले.

कुठल्याही प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन रखडलेले नाही. १५ ऑक्टोबरपूर्वीच ९० कोटी रुपये देण्यात आले आहेत. कुणाच्या बँक खात्याची तांत्रिक अडचण असल्यास त्यांना वेतन मिळाले नसेल. मात्र, शासनाकडून पूर्ण पैसे देण्यात आले आहेत. प्रशिक्षणार्थींना वेळेत वेतन मिळावे अशा सूचना आहेत.

प्रदीपकुमार डांगे, आयुक्त, कौशल्य विकास

हेही वाचा : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी

हजेरी पत्रकाचा घोळ

प्रशिक्षणार्थींच्या विद्यावेतनासाठी शासनाने ‘महास्वयम’ संकेतस्थळ सुरू केले. त्यावर प्रशिक्षणार्थीच्या आस्थापनामार्फत ‘लॉगिन’ करून हजेरी पत्रक ‘अपलोड’ करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, अनेक आस्थापनांतील कर्मचाऱ्यांनाच याची कल्पनाच नाही. तसेच अनेक ठिकाणचे कर्मचारी तंत्रस्नेही नसल्यामुळे हा गोंधळ उडत आहे. प्रशासनात सुसूत्रतेचा अभाव असल्यामुळे प्रशिक्षणार्थींना मात्र विद्यावेतनापासून वंचित राहावे लागत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mukhyamantri yuva karya prashikshan yojana beneficiaries did not received tuition fee css