नागपूर : राज्यातील परीक्षांमध्ये एकसूत्रता यावी यासाठी राज्य शैक्षणिक विभागाने २५ एप्रिलपर्यंत परीक्षा घेण्याबाबत परिपत्रक काढले. विदर्भातील अतिशय उष्ण वातावरणाचा विचार न करता सर्व राज्यात एकच नियम लागू केल्यामुळे या निर्णयाविरोधात शिक्षक संघटना व पालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. शिक्षण संचालकाच्या परिपत्रकाचा आधार घेत विदर्भातील स्थानिक परिस्थितीनुसार विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्याच्या सूचना उच्च न्यायालयाने शिक्षणाधिकारी यांना दिले.
स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ व महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ तसेच काही पालकांनी उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली. याचिकेवर न्या.नितीन सांबरे आणि न्या.वृषाली जोशी यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली. याचिकेनुसार, राज्यातील पहिली ते नववी या वर्गाच्या परीक्षा ८ ते २५ एप्रिलदरम्यान घेण्यात याव्यात, असा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाने घेतला. परीक्षांच्या नेहमीच्या वेळापत्रकात बदल करण्याचा हा निर्णय शैक्षणिक वर्ष संपत आले असताना अचानकपणे घेतला. दरवर्षी साधारणपणे १५ एप्रिलपर्यंत शाळांच्या परीक्षा संपत असत. शासनाच्या नव्या निर्णयामुळे आता त्या किमान दहा दिवस लांबणार आहे. एप्रिलअखेरपर्यंत विदर्भात उन्हाचा पारा चांगलाच वाढलेला असतो. विशेष बाब म्हणजे, लहान वयातील मुलांची परीक्षा एकरुपता आणण्यासाठी सर्वात शेवट सुरू करण्यात येणार आहे. परीक्षा २५ एप्रिलपर्यंत घेतल्यानंतर १ मेपर्यंत निकाल जाहीर करा, असेही शिक्षण विभागाने आपल्या आदेशात म्हटले आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. उच्च न्यायालयाने या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत स्थानिक विद्यार्थ्यांचा हिताचा विचार करत योग्य निर्णय घेण्याच्या सूचना केला. यापूर्वी याचिकाकर्त्यांना शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर करायचे आहे.
१५ जूनपासून शाळा नको
राज्य शासनाने ३० एप्रिल २००७ रोजी राज्यातील शाळा १५ जून रोजी सुरू करण्याबाबत परिपत्रक काढण्यात आले होते. याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यावर ८ जून २००७ रोजी हा आदेश रद्द करण्यात आला. शैक्षणिक वर्ष २००७-०८ पासून २०२३-२४ या कालावधीत यात काही बदल झाला नाही. विदर्भातील शाळा २१ एप्रिल रोजी बंद करण्यात येत होत्या आणि ३० जून रोजी सुरू करण्यात येत होत्या. १५ जूनपासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयालाही याचिकाकर्त्यांनी विरोध केला.
इयत्ता – परीक्षेचा कालावधी
पहिली व दुसरी – २३ ते २५ एप्रिल
तिसरी व चौथी – २२ ते २५ एप्रिल
पाचवी – ९ ते २५ एप्रिल
सहावी व सातवी – १९ ते २५ एप्रिल
आठवी व नववी – ८ ते २५ एप्रिल