नागपूर: पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या राज्यातील हजारो मुला-मुलींसाठी मुंबईतील ७ मे २०२३ रोजीची पोलीस भरती परीक्षा ही एक मोठी संधी होती. परंतु या पोलीस भरतीमध्ये अनुचित प्रकार झाल्याचे उघड झाले होते. या परीक्षेवर अनेक आरोपही करण्यात आले होते. पोलिसांकडे तक्रार देण्यात आली होती. पोलीस विभागानेही याचा तपास केला असून काही आरोपींना पकडण्यात आले होते. मात्र, आता या भरती घोटाळ्यामध्ये असलेला मुख्य आरोपी आता नव्याने होऊ घातलेल्या भरती प्रक्रियेमध्ये पुन्हा उतरल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे.
मुंबई पोलीस भरती २०२३ मध्ये परिक्षेत मोठ्या प्रमाणात हायटेक कॉपी करण्यात आली. कमी गुण असलेल्या मुलांना पात्र ठरवण्यात आले, यासह भरतीसाठी मुलांकडून १५-१५ लाख रुपये घेण्यात आल्याच्या असंख्य तक्रारी करण्यात आल्या होत्या. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने हा घोटाळा उघडकीस आणला असून पोलिसांनी एक दलालाला पकडले होते. या भारतामधील अनेक घोटाळे समोर येत असल्याने या प्रकरणात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालून पोलीस भरती प्रक्रिया स्थगित करावी व नव्याने पारदर्शक पद्धतीने फेरपरिक्षा घ्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. पोलीस भरती प्रक्रियेतील घोटाळ्यासंदर्भात राज्यातील विविध भागातून आलेल्या मुला-मुलींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पक्षकार्यालय टिळक भवन येथे भेट घेऊन या परिक्षेत झालेल्या घोटाळ्याची माहिती दिली होती. यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पोलीस महासंचालकांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून सर्व प्रकार त्यांना सांगितला व कारवाई करण्याची मागणी केली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र पाठवले होते. या पत्रात पुढे असे म्हटले होते की, पोलीस भरती प्रक्रियेत जास्त गुण असलेल्यांना वगळून कमी गुण मिळालेल्या मुलांना भरती करून घेण्यात आले आहे. शारिरिक चाचणीमध्येही पैसे घेऊन गुण वाढवण्यात आले, शारिरिक चाचणीत पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना लेखी परिक्षेपासून वंचित ठेवण्यात आले. पोलीस दलात भरती होण्यासाठी काही मुलांकडून १५-१५ लाख रुपये घेण्यात आले असून या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आला असा आरोप केला होता. मात्र, त्यानंतर ही भरती प्रक्रिया पूर्ण राबवण्यात आली.
हेही वाचा : अमरावती: पत्नी वारंवार करायची अपमान…अखेर पतीने कुऱ्हाड काढली अन्….
असा झाला आहे गोंधळ?
यावर्षी पुन्हा मुंबई पोलीस भरती सुरू आहे. यासाठी लेखी परीक्षा झाली असून नवी मुंबई पोलीस विभागातील शिपाई संवर्गातील १८५ पदांची परीक्षा पार पडली असून सदर परीक्षेसाठी १ हजार ३९९ पुरुष तर ४४३ महिला परीक्षार्थी होत्या. त्यानंतर आता शारीरिक चाचणी सुरू आहे. यामध्ये मुंबई पोलीस भरती २०२३ मध्ये मुख्य आरोपी असलेला उमेदवार शारिरीक चाचणीमध्ये असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने त्यांच्या एक्स खात्यावरून केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करावा अशीही मागणी केली आहे.