अनिल कांबळे
नागपूर : युवा वर्ग अंमली पदार्थाच्या व्यसनाधीन झाल्यामुळे राज्यात अंमली पदार्थाच्या तस्करी आणि विक्रीत मोठी वाढ झाली आहे. सर्वाधिक ड्रग्स तस्करी मुंबईत होत असून १६ ऑगस्टपर्यंत ९९७ प्रकरणात ४६ कोटींचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे, तर नागपूचा राज्यात दुसरा क्रमांक आहे. ही धक्कादायक माहिती राज्य पोलिसांच्या संकेतस्थळावरून प्राप्त झाली आहे.
सध्या राज्यात ड्रग्स आणि अन्य अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ड्रग्सचे व्यसन पूर्वी उच्चभ्रू लोकांपर्यंत मर्यादित होते. मात्र, आता ड्रग्सचा विळखा मोठमोठ्या आयटी कंपन्यांची कार्यालये, महाविद्यालीन विद्यार्थ्यांपासून ते शाळकरी मुलांपर्यंत पोहचला आहे. ड्रग्समधून होणारी कमाई कोट्यवधीमध्ये असल्याने अनेक दलाल यामध्ये सक्रिय असतात. मुंबई आणि गोवा हे दोन शहरे ड्रग्स तस्करीचे केंद्र आहे.
हेही वाचा >>> अमरावती : मद्यधुंद अवस्थेत स्वत:चेच घर जाळले, आरोपीला दोन वर्षांचा तुरुंगवास
महाराष्ट्रातील सर्वच शहरात मुंबईतून ड्रग्स, हिरोईन, एमडी, चरस आणि कोकेन पोहचविल्या जाते. पोलिसांचे जाळे आणि खबरे कमकुवत असल्यामुळे आजही ड्रग्स तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अनेक ड्रग्स तस्करांचे राजकीय तर काहींचे पोलीस विभागाशी तार जुळलेले आहेत. त्यामुळे कितीही प्रतिबंध केला तरीही प्रत्येक शहरात ड्रग्स पोहचत असल्याचे सत्य आहे.
व्यसनाधीन तरुणींचा टक्का वाढला
ड्रग्सचा वापर शारीरिक आणि लैंगिक क्षमता वाढविण्यासाठी केला जातो. त्यामुळेच तरुण-तरुणींमध्ये ड्रग्सचे व्यसन वाढले आहे. पब आणि क्लबमध्ये गांजाच्या सिगारेटपासून सुरुवात करणाऱ्या तरुणी चक्क ड्रग्सच्या आहारी जातात. त्यानंतर ड्रग्स मिळविण्यासाठी देहव्यापारासाठी तयार होतात. तसेच अनेक क्लबमध्ये तरुणींना ड्रग्सचे व्यसन लावल्या जाते. त्यानंतर तरुणींचा वापर ड्रग्स तस्करी आणि देहव्यापारासाठी करण्यात येत असल्याची माहिती आहे.
पोलिसांचे ‘अर्थपूर्ण’ संबंध
मुंबईतून राज्यभर जाणाऱ्या ड्रग्स तस्करांशी पोलिसांच्या एनडीपीएस पथकाचे ‘अर्थपूर्ण’ संबंध असतात. ड्रग्स कोट्यवधीत खरेदी-विक्री होत असल्यामुळे पोलिसांनी ड्रग्स पकडल्या गेल्यास मोठे नुकसान होते. त्यामुळे तस्करांच्या टोळ्या थेट पोलिसांशी हातमिळवणी करतात. पोलिसांच्या या भूमिकेमुळे देशातील युवा पिढी ड्रग्सच्या व्यसनात अडकत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी जरी ‘ड्रग्स फ्री सीटी’ मोहिम राबवित असले तरी कर्मचारी मात्र पैसा कमविण्यासाठी तडजोड करीत असतात, अशी चर्चा आहे.
ड्रग्स विक्रीची आकडेवारी
शहर ड्रग्स कारवाई अटक आरोपी ड्रग्सची किंमत
मुंबई ९९७ ११६१ ४६ कोटी २८ लाख
नागपूर ३०२ ३८८ २ कोटी ३१ लाख
पुणे ९० १०८ १ कोटी २० लाख