अनिल कांबळे
नागपूर : दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले असून राज्यात मुंबईनंतर नागपूर शहरातून सर्वाधिक दुचाकी चोरीला गेल्याची नोंद पोलिसांकडे झाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर पुणे शहर असून चोरीला गेलेल्यांपैकी फक्त सरासरी ३४ टक्के दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. नागपुरातून पाच वर्षांत ७ हजार ८०० दुचाकींची चोरी झाल्याची नोंद आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, दुचाकी चोरी करणाऱ्या टोळय़ा राज्यातील मोठमोठय़ा शहरात सक्रिय झाल्या आहेत. शहरातून दुचाकीची चोरी केल्यानंतर ग्रामीण भागात अगदी कमी किमतीत दुचाकी विक्री केली जाते. त्यामुळे दुचाकी चोरी लवकर उघडकीस येत नाही. विक्री करणाऱ्यांना दुचाकीचे कागदपत्र हरवल्याचे सांगून मध्यस्थाच्या माध्यमातून दुचाकीची विक्री केली जाते. ग्रामीण भागातून शहरात दुचाकी नेण्यात येत नाही. त्यामुळे चोरी गेलेली दुचाकी परत मिळण्याची शक्यता मावळते. तसेच ग्रामीण भागात पोलीस दुचाकीची कागदपत्रे किंवा विमापत्र तपासत नसल्यामुळे दुचाकी चोरांचे फावते. त्यामुळे दुचाकी चोरांच्या टोळय़ा मोठमोठय़ा शहरातून सापळा रचून वाहन चोरी करतात.
राज्यात वाहन चोरी करण्यासाठी मध्यप्रदेश, तेलंगणा, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, छत्तीसगड या राज्यातील टोळय़ा सक्रिय आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी आतापर्यंत अनेक टोळय़ांना जेरबंद केले असून त्यांच्याकडून दुचाकी जप्त केल्या आहेत. परंतु, जामिनावर सुटल्यानंतर या टोळय़ा पुन्हा चोरीसाठी सज्ज असतात. रात्री दुचाकी चोरल्यानंतर १२ तासांत राज्याबाहेर दुचाकी नेण्याचे कसब या टोळीकडे असते. परराज्यात गेलेली दुचाकी पुन्हा हस्तगत होणे जवळपास अशक्य असते.
कागदपत्रे बनावट
अन्य राज्यात ग्रामीण भागात अशिक्षित, मजूर आणि शेतकऱ्यांना चोरीच्या दुचाकीची विक्री केली जाते. त्यांना बनावट कागदपत्रे दिली जातात. स्वस्तात दुचाकी मिळत असल्यामुळे चोरीच्या दुचाकीला लगेच ग्राहक उपलब्ध होतो. बनावट कागदपत्र तयार करण्यासाठी आरटीओ कार्यालयात दलाल नेमलेला असतो.
सुटे भाग चोर बाजारात
चोरी केलेल्या दुचाकीची आठवडय़ाभरात विक्री न झाल्यास पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून दुचाकींचे सुटे भाग काढले जातात. ते सुटे भाग मोठय़ा शहरातील चोर बाजारात पाठविण्यात येतात. टायर, इंजिन, लाईट्स, मडगार्ड, बॅटरी, डिस्क असे सुटे भाग करून दलालांना देण्यात येतात.
चोरीला गेलेल्या वाहनांची आकडेवारी
वर्ष चोरी झालेली वाहने
२०१७ १६०४
२०१८ १४३९
२०१९ १३८४
२०२० ११७५
२०२१ १५०४
२०२२ (जुलै) ७९८
दुचाकी चोरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गुन्हे शाखेने वाहन चोरी प्रतिबंधक पथकाची स्थापना केली आहे. ‘सीसीटीव्ही’ आणि अन्य खबऱ्यांचीही मदत घेतली जाते. चोरी गेलेल्या बऱ्याच वाहनांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे.
– चिन्मय पंडित, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा.