नागपूर : राज्यात महिला व जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राज्यात यावर्षीसुद्धा महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. राज्यातील प्रमुख पाच शहरात २३२९ बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये पहिल्या स्थानावर मुंबई कायम आहे तर दुसऱ्या स्थानावर पुण्याचा क्रमांक लागतो. तिसऱ्या स्थानावर ठाणे शहर तर चवथ्या स्थानावर नागपूरचा क्रमांक लागतो, ही माहिती पोलिसांच्या संकेतस्थळावरील वार्षिक आकडेवारीतून समोर आली.
राज्यात महिलांवरील लैंगिक अत्याचारात वाढ झाली आहे. महिलांवरील बलात्काराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र राज्य देशात चवथ्या स्थानावर आहे. महिला सुरक्षेला प्राधान्य देण्याचा दावा जरी सरकारने केला असला तरी राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२४ यादरम्यान मुंबई शहरात सर्वाधिक ९५८ मुली-तरुणी आणि महिलांवर बलात्कार झाल्याच्या घटना उघडकीस आल्या. गेल्या वर्षी ८७८ बलात्काराची नोंद मुंबई पोलिसांत होती. तर विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्येसुद्धा मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर पुणे आहे. पुण्यात ४३९ महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या. तर ६१३ विनयभंगाच्या घटनांची नोंदसुद्धा पुणे शहरात झाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर ठाणे शहर असून ३९७ बलात्काराच्या गुन्हे दाखल आहेत. चवथ्या स्थानावर गृहमंत्र्याचे शहर म्हणून ओळखल्या जाणारे नागपूर आहे. नागपुरात २९७ बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. विनयभंगाच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे. तरुणी व महिलांशी अश्लील चाळे केल्याच्या ४९९ गुन्ह्यांची नोंद नागपूर पोलिसांनी केली आहे. अशा गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांसह कौटुंबिक हिंसाचारही वाढला आहे. महिला सुरक्षेबाबत पोलीस गंभीर नसल्याचे या आकडेवारीतून दिसून येत आहे.
हेही वाचा : नितीन गडकरी म्हणाले, “नागपुरात एक लाख कोटींची कामे केली, पण…”
आरोपींमध्ये सर्वाधिक प्रियकर-नातेवाईक
बलात्कार करणाऱ्या आरोपींमध्ये सर्वाधिक कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, पती, मित्र, प्रियकरांसह ओळखीच्याच व्यक्तींचा समावेश आहे. विवाहित महिलांना सासरच्या कुटुंबातीलच दीर, भासरा, सासरा, भाऊजीसह अन्य नातेवाईकांकडून लैंगिक अत्याचाराला बळी पडावे लागले आहे. तसेच सासरकडील काही नातेवाईकांनी धमकी देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तसेच लग्नापूर्वीच प्रियकर किंवा मित्रांनीसुद्धा विवाहितेचे लैंगिक शोषण केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
राज्य पोलिसांनी महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याबाबत गांभीर्य दाखवावे. लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांत सहभागी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी. आम्हीसुद्धा अशा घटनांकडे गांभीर्याने लक्ष देऊन दखल घेतो.
आभा पांडे (सदस्य, राज्य महिला आयोग)