नागपूर: महाबली, संकटमोचक, रामभक्त हनुमानावरच बंदिस्त होण्याची वेळ नागपुरात आली आहे. त्याची सुटका करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी यासाठी महापालिकेच्या आयुक्तांकडे हनुमान भक्तांनी साकडे घातले आहे. केळीबाग रोड ते सी पी ऍड बेरार काॅलेज महाल नागपूर येथील ८० फुट डी पी रोड चे काम झाले तेव्हा माजी खासदार राजे तेजसिंगराव भोसले यांच्या घराला लागून व केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या घराजवळ महाल येथे जागृत भोसले कालीन प्राचीन हनुमानाचे मंदिर होते. मंदिराचा भाग रोड बाधित म्हणून महापालिका प्रशासनाने काढला व हनुमानाची मूर्ती कपड्यात बांधून ठेवली. 

१२ एप्रिलला ला हनुमान जन्मोत्सव आहे त्या निमित्ताने तेथे छोटेसे मंदिर बांधून  विधीवत  संकटमोचक हनुमानाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी अशी मागणी मध्य नागपूर विकास आघाडीचे भूषण दडवे यांनी केली आहे ह्या मंदिराचे दर्शन राजे रघुजी भोसले हे त्या काळात  घेऊन लढाईला जात असतं अशी आख्यायिका  आहे.  दडवे यांनी याबाबत महापालिका आयुक्त व प्रशासक , जिल्हाधिकारी नागपूर व पालकमंत्री  चंद्रशेखर बावनकुळे यांनाही या कामासाठी साकडे घातले आहे.नागपुरात राम नवमी प्रमाणेच हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शोभा यात्रा काढली जाते. ठिकाणी महाप्रसादाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. हनुमान मंदिरात त्यादिवशी भक्तांची मोठी गर्दी असते.

भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात हनुमान भक्त आहेत. असे असताना महाल सारख्या जुन्या नागपुरात हनुमान बंदिस्त अवस्थेत आहे. त्याना या अवस्थेतून मुक्त करा यासाठी दडवे यांच्या सारखे हनुमान भक्त सरसावले आहे.