नागपूर : वेतनाची पुनर्रचना करण्यात यावी अशी मागणी करत महापालिकेच्या शहर बसचे वाहनचालक व वाहक गुरुवारी सकाळपासून बेमुदत संपावर गेल्यामुळे नवरात्राच्या पहिल्या दिवशी आपली बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यासह हजारो चारकमान्यांना त्याचा फटका बसला. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजप समर्थित भारतीय मजदूर संघाने हा संप पुकारला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजप समर्थित भारतीय मजदूर संघाशी संबंधीत चालक व वाहकांनी आठ दिवस आधी महापालिका प्रशासनाला व परिवहन विभागाला संपाची नोटीस दिली होती मात्र प्रशासनाकडून वेतन वाढीच्या संदर्भात कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही त्यामुळे नवरात्राच्या पहिल्या दिवशी हजारो कर्मचारी संपावर गेल्यामुळे डेपोमधून एकही बस निघाली नसल्याचा दावा कर्मचारी संघटनेने केला आहे. दरम्यान शहरात शहर बस सेवा ठप्प झाल्यानंतर त्याचा फटका विद्यार्थ्यासह हजारो चाकरमान्यांना बसला. विशेषत: हिंगणा, कोराडी, कामठी, हुडकेश्वर या भागासह अन्य भागातून मोठय़ा प्रमाणात विद्यार्थी आणि चाकरमानी बसने प्रवास करतात. मात्र प्रशासनाकडून कुठलीही सूचना देता कर्मचाऱ्यांनी बस सेवा बंद केल्यामुळे नागरिकांचे कमालीचे हाल झाले. अनेक कर्मचाऱ्यांना कार्यालयात वेळेवर पोहचता आले नाही. सकाळच्यावेळी विद्यार्थ्यांना शाळेत जाता आले नाही. सकाळी कार्यालयात जाताना कर्मचाऱ्यांची आज चांगलीच फजिती झाली. एरवी आपली बसने प्रवास करणाऱ्यांनी मेट्रोचा आधार आणि खाजगी वाहनांचा आधार घेत प्रवास केला. दरम्यान. महापालिकेकडून १२० मार्गांवर ४०० बसेस चालवण्यात येतात. या बसने दररोज जवळपास १.४३ लाख प्रवासी प्रवास करतात. यामध्ये जवळपास ५३ टक्के प्रमाण शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे असल्यामुळे त्याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसला आहे.

हे ही वाचा…काँग्रेसला घराणेशाहीचे ग्रहण, चंद्रपूर जिल्ह्यात नेत्यांच्या कुटुंबातील सदस्य उमेदवारीसाठी…

भारतीय मजदूर संघाचे कर्मचारी संपावर गेले असतानाच उद्या, शुक्रवारपासून वंचित बहुजन माथाडी ट्रान्स्पोर्ट अँड जनरल कामगार युनियन (व्हीबीएमटीजीकेएम) या संघटनेशी जुळलेल्या संघटनेच्या कर्मचाऱ्यांनीही संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे या संपावर प्रशासन काय निर्णय घेते याकडे आता लक्ष लागले आहे. दरम्यान प्रशासन आणि कर्मचारी संघटनामुळे प्रवासी मात्र वेठीस धरले जात आहे.

प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना कमी वेतन देण्यात येत असताना अनेक कल्याणकारी योजनांचा लाभही मिळत नाही. वारंवार प्रशासनाकडे निवेदन देऊनही आणि चर्चा केल्यानंतर प्रशासनाने आमची दखल घेतली नसल्यामुळे संघटनेने हा संप पुकारला असल्याचे संघटनेचे अध्यक्ष नागेश सहारे यांनी सांगितले.

हे ही वाचा…दुर्गोत्सव! हजारो मंडप, गरबा अन् विविध उपक्रम

‘आपली बस’ कर्मचाऱ्यांच्या पगारवाढ व पुनर्रचनेवर महापालिकेचे कुठलेही नियंत्रण नाही. चालक व वाहकांच्या वेतनासंदर्भात राज्य सरकारने दिलेल्या २०१०च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन महापालिका करते. बसचालक व वाहकांच्या वेतनाच्या पुनर्निर्धारणाचा मुद्दा राज्य शासनाकडे मांडला आहे. मात्र, यासंदर्भात नवी मार्गदर्शक तत्त्वे लागू झाल्याशिवाय आम्ही यात कुठलाही बदल करू शकत नाही’, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipal bus drivers and conductors went on indefinite strike affecting peoples on navratris first day vmb 67 sud 02