शहरातील रस्ते, पाणी, कचरा, पथदिवे, आरोग्य वाहतूक व्यवस्था आदी विविध मूलभूत समस्या दूर करून विकास करण्याच्या उद्देशाने महापालिकेने गेल्या तीन वषार्ंत लोकसहभागातून आणि प्रशासन पातळीवर अनेक चांगले उपक्रम आणि योजना राबविल्या असल्या तरी समस्या मात्र आजही कायम आहेत. त्यामुळे उपक्रमाचे फलित काय? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. शहराच्या विकास होत असल्याचा दावा सत्तापक्षाकडून केला जात असला तरी विरोधी पक्षांनी आणि नागरिकांनी महापालिकेच्या बेताल कारभाराबद्दल आवाज उठवणे सुरू केले आहे. शहराचे ‘ब्रँड अॅम्बेसिडर’ म्हणून महापालिका प्रशासनातील अनेक प्रमुख पदाधिकारी काम करीत असले तरी प्रत्यक्षात नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे त्यांना वेळ नसल्याचे चित्र आहे.
दीड वर्षांनी महापालिकेची निवडणूक असून विविध राजकीय पक्ष सक्रिय झाले असून सत्ता पक्षाच्या विरोधात आंदोलने सुरू झाली आहेत. महापालिकेत गेल्या आठ वर्षांंपासून भाजपची सत्ता असून या आठ वर्षांत शहराचा विकास केला जात असल्याचा दावा सत्तापक्षाकडून केला जात असला तरी विरोधी पक्षांनी महापालिकेमध्ये खासगी कंपन्याच्या मार्फत शहरात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. खासगी कंपन्यांनी केलेला गैरव्यवहार आणि त्यांची प्रकरणे समोर आणली जात असून नागरिकांमध्ये जागृती करण्याचे काम सुरू केले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत आम आदमी पक्ष सत्ता पक्षाच्या विरोधात रस्त्यावर उतरला असून शहरात आंदोलन करीत आहे.
महापालिकेत सलग दुसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर शहरातील नागरिकांच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या. निवडणुकीच्या काळात शहराच्या विकासासंदर्भात नागरिकांना अनेक आश्वासने देऊन त्याची पूर्तता करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. दिलेल्या आश्वासनानुसार शहरातील विकास कामे जलदगतीने होऊन शहराचा चेहरा मोहरा बदलेल, असे वाटले होते, मात्र, गेल्या तीन वर्षांत विकासाच्या नावाखाली लोकसहभागातून केवळ उपक्रम राबविले मात्र त्याचा काही उपयोग झाला नसल्याचे दिसून येत आहे. नागनदी, वृक्षारोपण हा दोन योजना लोकसहभागातून राबवून त्यांचे देशभर प्रचार करण्यात आला. मात्र, परिस्थिती वेगळी आहे. मुसळधार पाऊस आला की शहरातील विविध भागात पाणी साचले जाते पण त्यात काही सुधारणा करण्यात आली नाही. कचऱ्यांची समस्या आजही कायम आहे. आठ दिवसांवर गणेशोत्सव आला असताना शहरातील रस्त्याची समस्या कायम आहे. अनेक वस्त्यांमधील रस्त्यांवर खड्डे असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सांडपाण्याची समस्या कायम आहे. एलबीटी बंद करण्यात आल्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नाचा स्रोत कमी झाला आहे. त्यामुळे शहरातील अनेक विकास कामे ठप्प झाली आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार असताना वार्ड विकास निधी मिळत नसल्यामुळे सदस्य नाराज आहे. विरोधी पक्ष आरोप आणि टीका करीत असले तरी सत्तापक्षामध्ये सहभागी असलेल्या अनेक अपक्ष सदस्य कामे होत नसल्यामुळे उघडपणे नाराजी व्यक्त करीत आहेत. शहरातील विविध विकास कामे प्रशासन पातळीवर राबविणे शक्य नाही. त्यामुळे शहराचा विकासात लोकांचे योगदान असावे या उद्देशाने लोकसहभागातून नागनदी स्वच्छता, वृक्षारोपण, प्लास्टर ऑफ पॅरिस गणपती मूर्ती विसर्जन, स्वच्छ नागपूर सुंदर नागपूर अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम आदी योजना राबविल्या. त्या योजनांना काही सामाजिक संघटनासह नागरिक आणि शासकीय पातळीवर प्रतिसाद मिळाला. देशपातळीवर कौतुक झाले मात्र, आता ‘स्मार्ट सिटी’कडे वाटचाल सुरू असताना शहराच्या विकासाचे आणि नागरिकांच्या समस्यांचे काय? हा प्रश्न मात्र आजही कायम आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा