कर्मचाऱ्यांचा संप अन् अवकाळी पावसाने हजारो बुलढाणेकर त्रस्त झाले असतानाच आता पालिकेतर्फे बुलढाण्यात ‘रोजगार हटाव’ अर्थात अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली आहे. मोहिमेत शहरातील मुख्य चौक, रहदारीचे मुख्य मार्ग अन सौंदर्यीकरण सुरू असलेल्या ठिकाणची अस्थायी स्वरूपाची अतिक्रमणे काढण्यात येत आहे. अतिक्रमणधारकांना इशारा देण्यात आल्यावर आज, शनिवारी मोहिमेला वेग आला.
हेही वाचा >>> ‘एमबीबीएस’ला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून डॉक्टरची फसवणूक
मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली याचे नियोजन करण्यात आले. बुलढाणा पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाचे राजेश भालेराव, विमल बेंडवाल , शिवराम बेंडवाल, जितेंद्र बेंडवाल, शेख जाकीर शेख लाल, शेख शफीक शेख रहीम हे कारवाई करीत आहे. आज दुपारी साडेबारा वाजेपर्यंत अडीचशे लहान मध्यम दुकाने हटवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. यामध्ये कारंजा चौक, न्यायालय मार्ग, जिल्हाधिकारी कार्यालय मार्ग, चिखली थांबा, संगम ते जांभरून मार्ग परिसरातील अतिक्रमणाचा समावेश आहे. गजानन सरकटे यांनी कारवाईचे दृश्यांकन केले.