चंद्रपूर : ३५ कोटी पेक्षा अधिकचा मालमत्ता कर थकीत असल्याने महापालिकेने १ हजारावर मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे. आता तर एक लाखापेक्षा अधिकचा मालमत्ता कर थकीत आहे अशांची नावे चौका चौकात फलकावर लावण्यात आली आहे. मालमत्ता कर भरा अन्यथा आम्ही अशाच पध्दतीने नावे प्रसिध्द करू, कुणाची मानहानी झाली तर महापालिका जबाबदार राहणार नाही असा इशाराही महापालिकेने दिला आहे. महापालिकेच्या या करवसूलीच्या पध्दतीची सर्वत्र चर्चा आहे.
मार्च अखेर महापालिकेने मालमत्ता व पाणी कर वसूली जोरात सुरू केली आहे. आतापर्यंत ४५ कोटींचा मालमत्ता कर लोकांनी भरला आहे. मात्र अजूनही ३५ कोटींचा मालमत्ताकर शिल्लक आहे. ३५ कोटींच्या मालमत्ता कराची वसूली लवकरात लवकर व्हावी यासाठी महापालिका आयुक्त विपिन पालिवाल प्रयत्नरत आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आयुक्तांच्या नेतृत्वात मालमत्ता कर थकीत असलेल्या एक हजार पेक्षा अधिक मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे. आता तर चौका चौकात एक लाखापेक्षा अधिकचा कर थकीत असलेल्या मालमत्ता धारकांची नावे एका फ्लेक्स फलकावर प्रसिध्द केली जात आहे. या सर्व मालमत्ता धारकांना महापालिकेने ८ मार्च पर्यंत कर भरण्याची मुदत दिली होती. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम रविवार २२ मार्च पासून एक लाखापेक्षा अधिकचा कर शिल्लक असलेल्यांची नावे चौका चौकात फलकावर लिहून त्यांची मानहानी सुरू केली आहे.
थकीत कर वुसलीसाठी विशेष मोहिम राबविण्यास सुरुवात केली आहे.कर विभागातील अधिकारी कर्मचारी नागरिकांना समजावून सांगत असल्याने अनेक जणांनी कराचा भरणा केला आहे. एक लाखाच्या वर मालमत्ता कर थकीत असणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना मनपाच्या अधिकाऱ्यांकडून भ्रमणध्वनीद्वारे पाठपुरावा केला जात आहे. त्यांना यासाठी ८ मार्चची मुदतसुद्धा देण्यात आली आहे. मात्र याउपर करभरणा न केल्यास थकबाकीदारांची नावे विविध माध्यमातुन प्रसिद्ध करणे सुरू केले आहे. दरम्यान आता नावे प्रसिध्द केल्यानंतर जर कुणाची मानहानी झाली तर त्याला ते स्वतः जबाबदार राहणार असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. या होणाऱ्या कारवाईमुळे ज्यांना या मोहिमेची कल्पना झाली आहे ते थकीतदार ऑनलाईन अथवा ऑफलाईन माध्यमातुन आपल्या कराचा भरणा करताना दिसत आहेत.तरी अश्या संभाव्य कारवाई टाळण्यासाठी आजच मालमत्ता कराचा भरणा करण्याचे आवाहन चंद्रपूर महापालिकेतर्फे करण्यात येत आहे.