नागपूर : छत्रपती नगर येथील मैदानावर खासदार क्रीडा महोत्सव अंतर्गत सुरू असलेल्या क्रिक्रेट सामन्यात भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खंदे समर्थक असलेल्या मुन्ना यादव यांच्या मुलांनी पंच आणि स्पर्धेचे आयोजन करणाऱ्याला मारहाण करत अक्षरश: हैदोस घातला. यादव बंधूंच्या या हैदोसामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या खासदार क्रीडा महोत्सवाला गालबोट लागले.
गडकरी यांच्या संकल्पनेतून शहरात गेल्या दहा दिवसांपासून खासदार क्रीडा महोत्सवातंर्गत विविध स्पर्धा सुरू आहेत. शहरातील विविध भागात टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी छत्रपती नगर येथील मैदानावर खामला एलव्हेन आणि स्टार एलव्हेन या दोन संघामध्ये सामना होता. यातील एका संघामध्ये मुन्ना यादव यांची मुले मुलगा करण व अजुर्नचा समावेश होता. सामना सुरू झाल्यावर अजुर्न यादवने थ्रो बॉलिंगवरुन पंचाशी वाद घातला. पंचांनी समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यादव बंधूंनी कोणाचेही न ऐकता आम्ही सांगतो तसा निर्णय द्या, अशी मनमानी सुरू केली.
हेही वाचा >>> नागपूर : आचारसंहितेचा फटका, चर्चेविनाच विकास आराखडा मंजूर होण्याची शक्यता
पंचाने नकार देताच पंचाशी वाद घालत त्यांना आणि सामन्याच्या धावांची नोंद (स्कोरर) घेणाऱ्याला मारहाण करत मैदानावर धुमाकूळ घातला. हा धुमाकूळ सुरू असतानाच यादव बंधूंचे समर्थकही मैदानात आले. त्यांनी गोंधळ सुरू केल्यामुळे सामना बंद करावा लागला. यादव बंधूंच्या धुमाकुळामुळे अन्य खेळाडू भीतीने तेथून निघून गेले. सामन्याचे आयोजन करणाऱ्यांनी या घटनेची माहिती स्पर्धेचे आयोजक आणि भाजपचे शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांना दिल्याचे तेथील प्रत्यक्षदर्शनी सांगितले. ज्यांना मारहाण झाली ते उद्या शुक्रवारी गडकरी व पोलिसांकडे तक्रार करणार असल्याची माहिती आहे.
हेही वाचा >>> नागपूर : महिलेवर सामूहिक बलात्कार करून खून, एका नराधमाचा मृतदेहावरही अत्याचार
समर्थक सरकार येताच पुन्हा उच्छाद वाढला
यापूर्वी मुन्ना यादव यांच्या मुलांनी मारहाण केल्याची अनेक प्रकरणे समोर आली होती. मधल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकार असताना मुन्ना यादव यांच्यावर वचक होता. मात्र, राज्यात सत्ता आल्यानंतर पुन्हा यादव बंधूंचा उच्छाद वाढला आहे. विशेष म्हणजे, गेल्या तीन दिवसांपासून छत्रपती नगर मैदानावर कुठलेही वाद न होता सुरळीतपणे सामने सुरू असताना गुरुवारी यादव बंधूंच्या धुमाकुळामध्ये खासदार महोत्सवाला प्रथमच गालबोट लागले.
छत्रपती नगर येथील मैदानावर धुमाकुळाची माहिती स्पर्धेचे संयोजक आणि खेळाडूंकडून मिळाली आहे. याबाबत चौकशी करण्यात येईल आणि पक्षाच्या वरिष्ठांकडे तक्रार करण्यात येईल.