प्रसंग पहिला- नागपूरच्या छत्रपती व खामला चौकाचा परिसर, भाजपचे नेते मुन्ना यादव यांच्या पुत्राची स्वातंत्र्यदिनानिमित्त निघालेली मिरवणूक, डीजेच्या दणदणाटात भाजपचे हे कार्यकर्ते रस्त्यावर धुडगूस घालत आहेत, त्यामुळे सगळीकडे वाहतुकीची कोंडी झालेली आहे. काही उत्साही कार्यकर्ते शहरबसच्या टपावर चढून घोषणा देत आहेत. टपावरचे त्यांचे टपोरीछाप नाचणे बघून रस्त्यावरून जाणारे लोक जीव मुठीत धरून कसाबसा मार्ग काढत आहेत. याच मिरवणुकीत उघडय़ा कारमध्ये बसलेले अनेक उत्साही कार्यकर्ते लाजेने मान झुकेल, असे अंगविक्षेप करीत स्वच्छतेचे नारे देत आहेत. बंदोबस्तावर असलेले मोजके पोलीस हतबलपणे हा सारा प्रकार बघत आहेत.

प्रसंग दुसरा- शहरातील एका मंदिराजवळ स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी जमलेले तरुणांचे टोळके ध्वनिप्रदूषणाची मर्यादा ओलांडणाऱ्या आवाजात वाजणाऱ्या डीजेवर अंगातील कपडे काढून नाचत आहेत. मंदिरात जाणाऱ्या भाविकांमध्ये महिला व मुली दिसल्या की, या टोळक्यांच्या नाचण्याला आणखी जोर चढत आहे. या टोळक्यांचा अनोखा स्वातंत्र्योत्सव ज्या ठिकाणी सुरू आहे, त्याच्या बाजूलाच एक वृद्ध फूलविक्रेती बसली आहे. दीड ते दोन तासांपासून सुरू असलेला हा गोंगाट सहन न झाल्याने ती विक्रेती अचानक भोवळ येऊन खाली पडते, पण नाचणाऱ्यांचे तिच्याकडे लक्ष नाही. अखेर आजूबाजूचे लोक धावतात. तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडतात. ती शुद्धीवर येते तरीही या टोळीचा आनंदोत्सव सुरूच आहे.

प्रसंग तिसरा- दंडकारण्यात येणाऱ्या गडचिरोली व शेजारच्या छत्तीसगडमध्ये स्वातंत्र्यदिनाची पहाट भीतीचे सावट घेऊन उगवली आहे. तिरंगा फडकवला, तर खबरदार ही नक्षलवाद्यांची धमकी मनात घेऊन उठलेले नागरिक अनेक गावात स्वयंस्फूर्तीने ध्वजारोहणाला हजर राहात आहेत. काही गावात या नक्षल्यांच्या धमक्यांना न भीता गावकरी तिरंगा बचाओ अभियानात सहभागी होत आहेत. देशाच्या घटनेचे महत्त्व सांगणारे फलक या गावकऱ्यांच्या हातात आहेत. डीजेचा गोंगाट तर नाहीच, पण साधा कर्णाही नसताना या गावकऱ्यांच्या घोषणा शांत जंगलात दूरवर ऐकल्या जात आहेत. किमान या दिवशी तरी निर्भय होता आले, असा कृतार्थ भाव या साऱ्यांच्या चेहऱ्यांवर आहे. स्वातंत्र्याचे मोल काय असते, याची जाणीव या सर्वाना नव्याने होत आहे.

प्रसंग चौथा- स्वातंत्र्यदिनाचे निमित्त साधून व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अल्कोहोलिक अ‍ॅनानिमस या संस्थेने व्यसनाधीन पालकांच्या मुलांचा एक मेळावा आयोजित केला आहे. वडिलांच्या व्यसनाचे चटके सहन करावे लागणारी ही मुले आपापले अनुभवकथन करत आहेत. वडिलांचे व्यसन सुटले आणि आमच्या आयुष्यात खरोखर स्वातंत्र्याची पहाट उगवली, अशा आशयाचे अनुभव या मुलांच्या तोंडून ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावत आहेत. व्यसनी वडिलांमुळे शाळेत, शेजारी, सार्वजनिक ठिकाणी होणारी अवहेलना, अपमानाची वागणूक आता व्यसन सुटताच संपुष्टात आली आहे. आता घरी आणि दारी सुखाचे चार क्षण वाटय़ाला येत आहेत. मुख्य म्हणजे, आईच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य हाच आपल्यासाठी स्वातंत्र्याचा सर्वोच्च क्षण असल्याचे या मुलांचे सांगणे आहे.

स्वातंत्र्याच्या सत्तरीत प्रवेश करताना या दिनाच्या पाश्र्वभूमीवर दिसलेले हे चित्र एकीकडे अस्वस्थ करणारे, तर दुसरीकडे दिलासा देणारे आहेच, शिवाय इंडिया व भारत यातील भेद ठसठशीतपणे दर्शवणारे आहे. स्वातंत्र्यदिन हा जल्लोषात साजरा करण्याचा विषय आहेच, पण हा आनंद व्यक्त करताना सभ्यतेच्या साऱ्या मर्यादा ओलांडण्याचे खूळ अलीकडे वाढत चालले आहे. अलीकडे तर त्याने अतिरेकच गाठलेला आहे. मुख्यमंत्र्यांचे खास समर्थक मुन्ना यादव यांच्या चेल्यांनी जो धुडगूस घातला तो देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिमेलाच तडा देणारा आहे. स्वत:ची प्रतिमा सभ्य व सुसंस्कृत, अशी ठेवायची व समर्थक म्हणून टग्यांची फौज बाळगायची, हा अनोखा प्रकार सत्ताधाऱ्यांकडून या शहरात वारंवार अनुभवायला येत आहे. दिवसभर टिवटिवाट करणाऱ्या या नेत्यांना समर्थकांची ही कावकाव दिसत नसेल काय? आपला नेता राज्याचा प्रमुख आहे, याचा अर्थ या शहरावर आपलीच मालकी आहे, अशा थाटात हे समर्थक सध्या वावरू लागले आहेत. स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व काय, या प्रश्नाचे साधे उत्तरही ठाऊक नसलेले कार्यकर्ते, उडाणटप्पू तरुण केवळ अश्लील अंगविक्षेप करत नाचायला मिळते म्हणून जर हा दिन साजरा करण्यासाठी जमा होत असतील, तर हे आपले दुर्दैव आहे. केवळ नागपुरातीलच हे चित्र नाही. परवा सर्वच शहरात हा प्रकार बघायला मिळाला. तिरंगा हातात घेऊन उडत्या चालीच्या गाण्यांवर नाचणारी तरुणाई सर्वत्र होती. या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आपलाच सिंहाचा वाटा आहे, अशा थाटात नाचणाऱ्या या तरुणाईकडे बघून आपल्या देशाची लोकशाही खरंच प्रगल्भतेकडे वाटचाल करू लागली आहे का, असा प्रश्न अनेकांना पडला. राजकीय नेत्यांची व सत्ताधाऱ्यांची फौज म्हणून वावरणाऱ्या या तरुणाईला किमान या मुद्यावर तरी शिक्षित करावे, असे एकाही पुढाऱ्याला वाटत नाही, हीच खरी शोकांतिका आहे. या नेत्यांनी व सत्ताधाऱ्यांनी सामान्य जनतेला स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व सांगायचे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शहरात नंगानाच करायचा, हा विरोधाभास या दिनाच्या निमित्ताने ठळकपणे अधोरेखित झाला.

यांच्यापेक्षा तर दुर्गम भागात राहणारे गरीब लोक परवडले. सतत बंदुकीच्या दहशतीत वावरणाऱ्या व क्षणाक्षणाला स्वातंत्र्याचे मोल अनुभवणाऱ्या या लोकांनी आदरपूर्वक तिरंगा फडकवून या देशाचे प्रगल्भ नागरिक असल्याचा पुरावाच या दिनाच्या निमित्ताने दिला. कायम दडपणात वावरणाऱ्या या दुर्गम भागातील जनतेला लोकशाहीची खरी किंमत कळलेली आहे, त्यामुळेच ही जनता या दिवसाची आतुरतेने वाट बघत असते. नक्षलवादी संतापतील, या भीतीची पर्वा न करता रस्त्यावर आलेली ही गरीब, अर्धशिक्षित, अडाणी जनता एकीकडे व महागडय़ा गाडय़ा घेऊन तिरंग्याचा अपमान करत सैराट पळणारे शहरी भागातील कार्यकर्ते व तरुणांची फळी दुसरीकडे, असे दुभंगणारे चित्र या दिनाच्या निमित्ताने अनेकांनी अनुभवले. व्यसनाधीनतेमुळे कौटुंबिक हिंसाचारात आजवर जगण्याचे स्वातंत्र्य हिरावलेल्या मुलांनी या दिनाच्या निमित्ताने केलेले अनुभवकथन एकीकडे, तर स्वातंत्र्यदिनाची सुटी ‘एन्जॉय’ करायला चाललो, असे सांगत घराबाहेर पडून मौजमस्ती करणारी तरुणाई दुसरीकडे, हे विसंवादी चित्र अस्वस्थ करणारे होते. सार्वजनिक उत्सवाला बीभत्स व किळसवाणे रूप देणाऱ्या या कार्यकर्त्यांचा व तरुणाईचा विळखा आता स्वातंत्र्यदिनाला सुद्धा पडला आहे, हे दुर्दैवी वास्तव १५ ऑगस्टने दाखवून दिले. यालाच सत्तरी पार केली म्हणायचे काय?

devendra.gawande@expressindia.com