लोकसत्ता टीम

नागपूर : गृहमंत्र्याचे शहर म्हणून ओळख असलेल्या नागपुरात रविवारी पहाटेच्या सुमारास अंबाझरीतील पांढरा बोडी भागात हत्याकांडाचा थरार बघायला मिळाला एका कुख्यात गुन्हेगाराने आपल्याच मित्राचा चाकूने भोसकून खून केला. हे हत्याकांड उघडकीस येतात नागपूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नागपूर जिल्ह्यात आणि शहरात गेल्या दोन दिवसात चार हत्याकांड उघडकीस आले आहेत. त्यापैकी दोन हत्याकांड शहरात तर दोन हत्याकांड ग्रामीण भागात घडले आहेत. रविवारी पहाटेच्या सुमारास अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पांढराबोडी भागात गॅंगवॉर भडकले. यामध्ये कुख्यात प्रशांत इंगोले ( रा. पांढराबोडी) याने मित्र दीपक गोविंद बसवंत (वय ३४, राहणार पांढराबोडी) याचा चाकूने भोसकून खून केला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पांढराबोडीत कुख्यात गुन्हेगार प्रशांत इंगोले चे वर्चस्व आहे. शनिवारी दीपक बसवंत याच्यासोबत प्रशांत इंगोले चा वाद झाला होता. त्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास प्रशांतच्या टोळीने दीपक चा खून करण्याचा कट रचला आणि चौघांनी आज पहाटेच्या सुमारास दीपक वर हल्ला करून त्याचा खून केला. ही घटना उघडकीस येताच अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेणे सुरू केले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नवनियुक्त ठाणेदाराला अद्याप पर्यंत अंबाझरीतील गुन्हेगारी व नियंत्रण मिळवण्यात अपयश आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

छातीत चाकू भोसकून युवकाचा खून

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तीन युवकांनी मंडपवाल्याकडे मजूर असलेल्या एका युवकाचा पैशाच्या वादातून खून केला. ही थरारक घटना धुळवळीच्या मध्यरात्री एमआयडीसी परिसरात घडली. रोहित राजेश तिवारी (२८, वानखेडे आउट,वैशालीनगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. आकाश भंडारी असे मुख्य आरोपीचे नाव असून तो फरार झाला आहे.

रोहित तिवारी हा साई मंडप डेकोरेशन, इंदिरा मातानगर येथे मजूर आहे. आरोपी आकाश भंडारी हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा गु्न्हा दाखल आहे. तो वस्तीत काही सहकाऱ्यांसह धार्मिक कार्यक्रम करतो. त्या माध्यमातून तो दहशत पसरवतो. गेल्या महाशिवरात्रीला आकाश भंडारी याने मित्र रोहित तिवारी याच्या माध्यमातून मंडप डेकोरेशनचे सामान भाड्याने घेतले होते. मात्र, भाड्याचे १२ हजार रुपये तो देत नव्हता. त्यामुळे रोहितचा मालक पैशासाठी तगादा लावत होता. त्यामुळे रोहितने आकाशला पैसे मागितले. मात्र, तो पैसे द्यायला तयार नव्हता. त्यामुळे दोघांत गुरुवारी वाद झाला. या वादाचा वचपा काढण्यासाठी आकाशने तीन मित्रांसह रोहितचा खून करण्याचा कट रचला. शक्रवारी मध्यरात्री साई मंडप डेकोरेशनसमोर बसलेल्या रोहितवर आकाश व त्याच्या साथिदारांनी चाकूने हल्ला केला. यामध्ये गंभीर जखमी रोहितचा उपचारादरम्यान शनिवारी दुपारी मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

दोन हत्याकांडांनी हादरला जिल्हा

धुळवळीच्या दिवशी दोन हत्याकांडांनी नागपूर जिल्हा हादरला असून कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. होळीनिमित्त एवढा मोठा बंदोबस्त असतानाही नरखेड आणि कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीत हत्याकांड घडल्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण झाला आहे.

पहिल्या घटनेत, नरखेडमध्ये राहणारा आरोपी नितेश ऊर्फ जर्मन माधव कवडती हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. शुक्रवारी सकाळी दहा वाजता त्याच्या दुचाकीची एका युवकाच्या दुचाकीला धडक लागली. त्यानंतर जर्मन त्या युवकालाच शिवीगाळ करीत होता. त्यामुळे विजय वसुले यांनी मध्यस्थी करुन वाद सोडविला. मात्र, आरोपी जर्मनने विजय यांना शिवीगाळ केली. ही बाब विजय यांचा मुलगा हिमांशू याला कळली. त्याने जर्मनला गाठून जाब विचारला. जर्मनने चाकू काढून हिमांशूच्या गळ्यावर वार करुन खून केला. या प्रकरणी नरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अटक केली.

दुसऱ्या घटनेत, महेश विनोद खंडाळे (१८, रा.दहीबाजार) हा आरोपी रोशन भैयाजी दांडेकर याच्याकडे वाहनचालक म्हणून काम करीत होता. रोशनने चालक महेशला २० हजार रुपये दिले होते. मात्र, ते पैसे महेशकडून हरविल्या गेले. भरपाई म्हणून गेल्या काही दिवसांत महेशने १६ हजार रुपये दिले. मात्र, ४ हजार रुपये देणे बाकी होते. रोशनने त्याच्याशी पैशावरुन वाद घालून शिवीगाळ केली. त्यानंतर कुणाल रमेश काकडे (डोंगरगाव) याच्या मदतीने महेशचे अपहरण करुन शेतात नेले. तेथे त्याला बेदम मारहाण करुन चाकूने भोसकून खून केला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली.