नागपूर : सध्या गृहमंत्र्यांच्या शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे. हत्याकांडांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून पोलिसांचे अपयश स्पष्ट दिसत आहे. रविवारी रात्री गुंड कार्तिक चौबे याचा भरचौकात खून करण्यात आला.
सक्करदरा हद्दीतील गौरव खडतकर हत्याकांडातील आरोपी कुख्यात गुंड कार्तिक चौबे हा पाच वर्षानंतर कारागृहातून सुटून आला. दरम्यान पुन्हा वर्चस्व निर्माण करण्याचा त्याने प्रयत्न सुरु केला होता. हीच बाब सक्करदरा परिसरातील इतर गुंडांना खटकत होती. यातूनच रविवारी रात्रीच्या सुमारास चार ते पाच आरोपींनी अचानक धारदार शस्त्राने वार करुन त्याची निर्घृन हत्या केली. यावेळी कार्तिकचे मित्रच “गद्दार” निघाले आणि त्यांनी प्रतिस्पर्धी टोळीशी संगणमत करुन मित्राचाच `गेम’ केल्याची चर्चा आहे. ही थरारक घटना सक्करदरा हद्दीतील सोमवारी क्वॉर्टर, शाहु गार्डन, हनुमान मंदिर परिसरात रविवारी रात्री १ च्या सुमारास घडली. याप्रकरणी सक्करदरा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. कार्तिक उमेश चौबे (२८) रा. सोमवारी क्वॉर्टर, शाहू गार्डनजवळ (हनुमान मंदिर), असे हत्या झालेल्या गुंडाचे नाव आहे. तो विवाहित असून पत्नी त्याला सोडून गेली होती. प्राप्त माहितीनुसार, कार्तिक चौबे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. सक्करदरा परिसरात त्याची प्रचंड दहशत होती. जवळपास १२ ते १४ गंभीर स्वरुपाचे गुन्हे त्याच्यावर असल्याचे सांगितले जाते.
कारागृहातून सुटून येताच हत्याकांड
पाच वर्षापूर्वी सक्करदरा हद्दीतील सोमवारी क्वॉर्टर परिसरात झालेल्या गौरव खडतकर हत्याकांडात त्याला अटक करण्यात आली होती. याप्रकरणात तो पाच वर्ष कारागृहात होता. ३ महिन्यापूर्वीच तो कारागृहाबाहेर आला. बाहेर आल्यानंतर पुन्हा तो गुन्हेगारी जगतात जम बसविण्याच्या प्रयत्नात होता. यादरम्यान आरोपी रोशन गायकवाड याच्यासोबत त्याचे खटके उडत होते. शेवटी रविवारी कार्तिकच्या दोन मित्रांनी त्याला दारु पिण्याच्या बहान्याने बोलावले. या दोघा मित्रांसोबत त्यांच्या मित्रांनीही दारु पार्टीत सहभाग घेतला. पार्टीत रोशन गायकवाड हा सुद्धा होता.
यावेळी वर्चस्वाच्या कारणावरुन रोशनने वाद घातला आणि काही कळण्यापूर्वीच त्याने कार्तिकच्या डोक्यावर दारुची बॉटल फोडली. अचानक झालेल्या हल्ल्यातून कार्तिक सावरणार तोच रोशन व त्याच्या साथीदरांनी धारदार शस्त्राने वार केले. छातीच्या भागात पाच घाव लागल्याने कार्तिक हा रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनेची माहिती मिळताच सक्करदरा पोलिसांनी घटनास्थळ गाठले. गंभीर अवस्थेत कार्तिकला मेडिकल रुग्णालयात हलविण्यात आले. येथील डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले. याप्रकरणी सक्करदरा पोलिसांनी आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. पोलिसांचे विविध पथके फरार आरोपींचा शोध घेत आहेत.आरोपींनी गौरव खडतकर हत्याकांडाचा वचपा काढल्याची परिसरात चर्चा आहे.