नागपूर : दिवाळी तोंडावर आली असताना वेतन आणि बोनस न दिल्यामुळे चिडलेल्या दोन नोकरांनी ढाबामालकाचा गळा आवळून आणि डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना शनिवारी पहाटे कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाचगावमध्ये उघडकीस आली. काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
राजू डेंगरे (४५, रा. सूरगाव) हे माजी सरपंच असून नुकतेच सूरगाव ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी निवडून आले होते. त्यांचा पाचगाव जवळ ढाबा आहे. दिवाळीचा सण तोंडावर असताना ढाब्यावरील नोकरांनी त्यांनी पगार लवकर आणि बोनस देण्याची विनवणी केली. ढाबामालक डेंगरे यांनी होकार देऊन नोकरांना काम करण्यास सांगितले. दिवाळीच्या पहिल्या दिवशी वसुबारसला दोन नोकरांनी ढाबा मालकाला पगार आणि बोनसची आठवण करून दिली. मात्र, मालकाने वेळ मारून नेली.
हेही वाचा – नागपूर ते शिर्डी विमान सेवेसाठी प्रयत्न – स्वाती पांडे
शुक्रवारी डेंगरे यांना नोकरांनी पुन्हा बोनसची मागणी केली. त्यावरून नोकर आणि मालकांमध्ये वाद झाला. नोकरांनी ढाबामालक डेंगरे यांचा गळा आवळला. त्यानंतर डोक्यात दगड घालून ठार केले. त्यानंतर डेंगरे यांचीच कार घेऊन पळ काढला. मात्र, त्या कारचा पुढे काही अंतरावर अपघात झाल्याची माहिती आहे. हत्याकांडाची घटना शनिवारी पहाटे पाच वाजता उघडकीस आली. कुही पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेणे सुरू आहे.