लोकसत्ता टीम
यवतमाळ : येथील स्टेट बँक चौकात आठ महिन्यापूर्वी विद्यार्थिनीच्या दुचाकीची धडक लागल्यानंतर नागरिकांनी मुलीची बाजू घेत तरुणाला बेदम चोप दिला. या वादात मार खाऊन अपमानीत व्हावे लागल्याचा वचपा तरुणाने आठ महिन्यानंतर त्या विद्यार्थिनीची हत्या करून काढला. केवळ अपमानाच्या सुडातून झालेल्या या हत्याकांडाने समाजमन सुन्न झाले आहे.
येथील मोहा फाटा ते बोरगाव धरण जंगल परिसरात दोन दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या आणि कुठलाही पुरावा नसलेल्या आव्हानात्मक अशा धनश्री भोला पेटकर (१९, रा. शुभम कॉलनी, वाघापूर) या विद्यार्थिनीच्या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले.
आणखी वाचा-हिंदू देवस्थानाप्रमाणे मशीद, चर्चही सरकारी नियंत्रणात येऊ शकते? आता तर थेट विधानसभा अध्यक्षांनीच…
या प्रकरणातील मारेकरी प्रमोद नथ्थूजी कोंदाणे (३० वर्ष रा. बनकर ले-आऊट, वाघापूर) याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी पत्रकार परिषदेत दिली. आठ महिन्यापूर्वी स्टेट बँक चौक परिसरात फोनवर बोलत उभ्या असलेल्या प्रमोदला धनश्रीने दुचाकीने धडक दिली होती. यावेळी प्रमोदने धनश्रीला सुनावले. त्यामुळे दोघांचा त्या ठिकाणी वाद झाला. दरम्यान धनश्रीने आरडाओरड करीत परिसरातील नागरिकांना गोळा केले. त्या नागरिकांनी प्रमोदला चांगलाच चोप दिला होता. त्या मारहाणीमुळे प्रमोदला काही दिवस बिछान्यावर पडून रहावे लागले होते. या घटनेचा राग प्रमोदच्या मनात होता. दरम्यान धनश्री वाघापूर परिसरात राहत होती तर प्रमोद हासुद्धा वाघापूर परिसरात राहात होता. त्यामुळे अधून-मधून दोघेही एकमेकांसमोर येत होते. त्यावेळी धनश्री प्रमोदकडे हसून त्याला मारहाणीच्या घटनेवरून चिडविण्याचा प्रयत्न करीत होती. त्यानंतर प्रमोदने धनश्रीसोबत मैत्री करण्याचे ठरवले. दोघांची मैत्री झाल्यानंतर त्यांची भेट झाली तर ते बोलत घरी जात होते.
गुरुवार, ५ डिसेंबरला धनश्रीचा धामणगाव मार्गावर असलेल्या वाधवानी महाविद्यालयात पेपर होता. मात्र तिची दुचाकी सुरू होत नसल्याने ती घरून पायी निघाली होती. यावेळी वाटेत तिला प्रमोद दिसल्याने त्याने तिला सोडून दिले. धनश्रीने सायंकाळी ५ वाजता पेपर सुटल्यानंतर त्याला घ्यायला बोलाविले. प्रमोद धनश्रीला घेण्यासाठी महाविद्यालयात गेला. त्यावेळी शेतातील मजूरांना पैसे देण्यासाठी जायचे असल्याने तू सोबत येतेस की, घरी जाते, असा प्रश्न केला. मात्र दहाच मिनिटाचे काम असल्याने धनश्री त्याच्यासोबत गेली. प्रमोद तिला बोरगाव धरण परिसरातील घेवून गेला. धनश्रीच्या मनात शंका आल्याने तिने वाद करीत नागरिकांसह पोलिसांना बोलावून पुन्हा तुला चोप द्यायला लावू का असे म्हटले. यावेळी प्रमोदचा राग विकोपाला गेल्याने त्याने धनश्रीला खाली पाडून तिच्या चेहऱ्यावर तीन ते चार वेळा मोठ्या दगडाने वार करीत तिची निर्घृण हत्या केली. ही संपूर्ण कबूली प्रमोदने पोलिसांसमोर दिली.
आणखी वाचा-अपंग बांधवांचा विधान भवनाच्या द्वारावर थांबा; दुचाकीसह…
मैत्रीणीमुळे पोलिसांना लागला सुगावा
दोन दिवसांपूर्वी धनश्रीचा मृतदेह जंगलात आढळला होता. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हे नोंद केले होते. मात्र मारेकऱ्याबाबत पोलिसांना सुगावा लागत नव्हता. एलसीबी पथकाने महाविद्यालयातील धनश्रीच्या मैत्रीणीची चौकशी केली. तेव्हा धनश्रीला घेण्यासाठी महाविद्यालयात प्रमोद आला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी धनश्रीच्या संपर्कातील प्रमोदची चौकशी सुरू केली. वाघापुरातील प्रमोद नावाच्या काही व्यक्तींना ताब्यात घेत कसून चौकशी केली.
धनश्रीच्या मोबाईलवरील कॉल डिटेल्सवरून खरा मारेकरी प्रमोदपर्यंत पोलीस पोहोचले. वाघापूर येथील एका पान टपरीवरून त्याला ताब्यात घेतले. मारेकरी प्रमोद कोंदाणे हा क्राईम पेट्रोल मालिका बघत होता. त्यातूनच धनश्रीच्या हत्येनंतर पोलिसांच्या हाती लागू नये यासाठी त्याने हत्येच्या वेळी वापरलेले कपडे प्रथम धुवून काढले होते. पोलिसांना ओळख पटू नये म्हणून कटींगही केली होती. क्राईम पेट्रोल सिरियलमधून हा प्लॅन त्याने केल्याचा पोलीस तपासात पुढे आले असून याबाबतची कबूलीही देखील त्याने पोलिसांसमोर दिली. प्रमोद दूधाचा व्यवसाय करत होता. तो विवाहित असून त्याला एक मुल आहे आणि त्याची पत्नी गर्भवती आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियूष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते, सहायक पोलीस निरीक्षक सुगत पुंडगे, अलोम मुडे,योगेश गटलेवार, साजीद सैय्यद, बंडु डांगे, अजय डोळे, प्रशांत हेडाऊ, योगेश डगवार, रितूराज मेडवे, सलमान शेख, देवेंद्र होले, योगेश टेकाम, सुनील मेश्राम आदी एलसीबीतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी पार पाडली.