नागपूर : नवे पोलीस आयुक्त रुजू होताच शहरात हत्याकांडाची मालिका सुरु झाली. शहरात अचानक खुनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आधी हुडकेश्वरमध्ये दुहेरी हत्याकांड, नंतर कपिलनगर ठाण्यांतर्गत एका गुंडाने दारूसाठी व्यावसायिकाचा खून केला आणि आता वाठोडा पोलीस ठाण्यांतर्गत गुंडाच्या खुनाची घटना पुढे आली आहे. गत ५ दिवसांमध्ये खुनाची ही चवथी घटना आहे. फिरोज उर्फ पक्या शेख सत्तार (२२) रा. ऑरेंजनगर, वाठोडा असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी फिरोजच्या खुनात परिसरातच राहणाऱ्या सुमित साखरकर (२४) आणि प्रणय सरदार (२४) ला अटक केली आहे. दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फिरोज कुटुंबासोबत वाठोडाच्या स्मित बारमागे राहत होता. बारसमोरच त्याची चहा-नाश्ता आणि पान टपरी आहे. त्याच्यावर जवळपास २० गुन्हे नोंद असल्याची माहिती मिळाली आहे. फिरोज अनेकदा रात्रीला पानठेल्यातच झोपत होता. रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास फिरोज घरून बाहेर गेला. रात्री उशिरापर्यंतही तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तो दुकानातच झोपला असल्याचा अंदाज लावला. मात्र सकाळी ६ वाजूनही त्याचा अता-पता नव्हता. त्यामुळे ६.३० वाजताच्या सुमारास कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. दुकानात पाहिले असता तो तेथे नव्हता. दरम्यान स्मित बारमागील एका मोकळ्या भूखंडावर तो रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. वाठोडा पोलीस घटनास्थळावर पोहोचले.

हेही वाचा – प्रेयसीवर जीवापाड प्रेम, साता जन्माच्या आणाभाका; पण अर्ध्यावरती डाव मोडला अन् प्रियकराने…

फिरोजच्या छाती, पोट, पाठ आणि तोंडावर तीक्ष्ण शस्त्रांनी वार करून खून करण्यात आला होता. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. चौकशीत फिरोज रविवारी रात्री सुमित आणि प्रणयसोबत असल्याचे समजले. दोघेही परिसरातीलच ओयो हॉटेलमध्ये मिळाले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता फिरोजचा खून केल्याची कबुली दिली. आरोपी खुनाचे खरे कारण न सांगता उडवा-उडवीची उत्तरे देत आहेत. त्यांनी पोलिसांना सांगितले की, फिरोज नेहमी दादागिरी करून त्यांना धमकावत होता. त्यामुळे दोघांनीही फिरोजचा खून केला.

हेही वाचा – नागपूर : टीप मिळताच घातला दरोडा, पोलिसांनी ३६ तासांच्या आत ठोकल्या बेड्या…

दोन्ही आरोपींना ‘ओयो’मधून अटक

पक्याचा खून केल्यानंतर सुमित आणि प्रणय यांनी पळ काढला. दुसऱ्या दिवशी दोघांनीही आपापल्या प्रेयसींना भेटायला बोलावले. दोघेही प्रेयसींसोबत एकाच ओयो हॉटेलमध्ये गेले. दरम्यान, पोलिसांनी सुमितच्या प्रेयसीच्या घरी छापा घातला. तीसुद्धा घरातून बेपत्ता होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांचे लोकेशन घेऊन ओयो हॉटेलमध्ये छापा घातला. दोघेही प्रेयसींसोबत होते. दोघांनाही अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murder of notorious gangster in wathoda adk 83 ssb