अमरावती: सासरच्यांनी जावयाची मान पिरगळून हत्या केल्याची घटना चिखलदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. ही घटना गेल्या १४ जून रोजी चुनखडी येथे घडली होती. आपल्या पतीला माहेरकडील लोकांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यातूनच त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय पत्नीने व्यक्त केला होता. या प्रकरणात तपासाअंती पोलिसांनी अडीच महिन्यानंतर चौकशी अहवालाच्या आधारे सासरच्या चौघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे.
संजू चन्नू जामुनकर (४०, रा. मरीता) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी सोनाजी लोफे धिकार, भाकलू सोमा धिकार, केंडे सोमा धिकार सर्व रा. चुनखडी व मातिंग भय्या सेलूकर रा. हतरू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संजू जामूनकर व त्याची पत्नी बुकली यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाला होता. या वादात संजूने पत्नी बुकलीला मारहाण केली होती. ही बाब बुकलीने माहेरच्यांना सांगितली होती. त्यामुळे धिकार कुटुंबीयांनी तिला माहेरी नेले होते. त्यानंतर संजू हा सासरी पोहचला आणि पत्नीला आपल्या घरी परत घेऊन आला.
१३ जून रोजी संजू जामूनकर हा सेमाडोह येथे बँकेत केवायसी करण्यासाठी गेला होता. तेथून गावी जाण्यासाठी वाहन नसल्याने तो चुनखडी येथील सासरी गेला. रात्री तो मुक्कामी होता. त्यावेळी मुलीला परत घेऊन गेल्याच्या रागातून आरोपींनी संजू जामूनकरची मान पिरगळून हत्या केली होती. हत्या कुणी केली, याचा उलगडा झाला नव्हता. तपासात ही बाब समोर आल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.