नागपूर : भरधाव वाहनाने दुचाकीला जबर धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दोन मित्रांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर कोंढाळीजवळ रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली. मात्र, दोन्ही युवकांच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाला असून दोघांपैकी एकाचा गळा चिरल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी कोंढाळी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून काही घातपात आहे का? याबाबत तपास सुरु केला आहे. भूषण ज्ञानेश्वर कडवे (२७, जुनापाणी, काटोल) आणि बॉबी सोहनलाल उईके (४५, कळमना झोपडपट्टी, नागपूर) ही मृत तरुणांची नावे आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भूषण कडवे याचा जुनापाणी बसस्थानकावर पानठेला आहे. तो आईवडिल आणि भावासह राहतो. तर बॉबी हा अनाथ असून तो एका सरदाराच्या ढाब्यावर स्वयंपाकी म्हणून काम करतो. बुधवारी दोघेही कोंढाळीच्या बाजारात सोबत फिरत होते. सायंकाळी होताच दोघेही दुचाकीने नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर कोंढाळीजवळून जात होते. त्यापूर्वी, त्यांनी रस्त्याच्या एका पेट्रोल पम्पवर दुचाकीत पेट्रोल भरले. दोघेही दारु पिऊन असल्यामुळे दुचाकीवरुन दोनदा खाली पडले. तेथून थेट महामार्गावरुन सुसाट जात होते.

कोंढाळीजवळील सूत गिरणीजवळ एका भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोघेही रस्त्यावर फेकल्या गेले. धडक देणाऱ्या वाहनाचा काही भाग भूषणच्या डोक्याला लागला. तसेच त्याचा गळा कापल्या गेल्यामुळे भूषणचा जागीच मृत्यू झाला. तर बॉबी हा गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेला होता. काही वेळात त्या रस्त्यावरुन जाणाऱ्या एका वाहनचालकाने पोलिसांना माहिती दिली.

कोंढाळीचे ठाणेदार राजकुमार त्रिपाठी यांनी लगेच ताफ्यासह घटनास्थळावर धाव घेतली. जखमी बॉबी याला कोंढाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, बॉबीचाही काही वेळात मृत्यू झाला. भूषण आणि बॉबीचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले. उत्तरिय तपासणीसाठी शवविच्छेदनगृहात रवाना केले. या प्रकरणी आरोपी वाहनचालकावर कोंढाळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी वाहनचालकाचा आणि अपघात करणाऱ्या वाहनाचा पोलीस शोध घेत आहेत.

दोघांचाही खून झाल्याची चर्चा

बॉबी याच्या डोक्याला काहीतरी जड वस्तूने मारल्याच्या खुणा आहेत तर भूषण कडवेचा तर चक्क गळा चिरल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे. दोघेही एकाच दुचाकीवर होते आणि त्यांचे अनेकांसोबत वैर होते. बॉबीची जीभ बाहेर निघाली असून त्याच्याही मानेवर जखमा आहेत. ही स्थिती बघता दोघांचाही खून झाला असावा, अशी चर्चा आहे. मात्र, कोंढाळीचे ठाणेदार राजकुमार त्रिपाठी यांनी घातपाताचा इन्कार केला आहे. धडक देणाऱ्या वाहनाचा भाग भूषणच्या गळ्यावर लागल्यामुळे त्याचा गळा चिरल्याचे सांगितले.