अमरावती : मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ट्रिपल इंजिन सरकार हे खुनी सरकार आहे, असा आरोप राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्‍या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. सध्‍याच्‍या सरकारचा कारभार आपण सर्व जण पाहत आहात. ज्‍या पद्धतीने या लोकांनी उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडले, त्‍यामुळे लोकांच्‍या मनात या सरकारविषयी रोष आहे, असेही त्‍या म्‍हणाल्‍या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमरावतीत प्रसार माध्‍यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्‍हणाल्‍या, आयकर, सीबीआय आणि ईडीचा गैरवापर करून कोविड काळात चांगली कामगिरी करणारे उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्‍याचे पाप भाजपने केले आहे. साम, दाम, दंड, भेद हे देवेंद्र फडणवीस यांचे शब्‍द अजूनही मला आठवतात. काहीही करा, पण जिंका, असे ते म्‍हणतात.

हेही वाचा >>> पक्षाने संधी दिल्यास वर्ध्यातून लोकसभा लढणार-सुप्रिया सुळे

एकनाथ शिंदे यांच्‍या सरकारच्‍या काळात कुठली चांगली कामे झालीत, हे आपल्‍याला कुणीतरी सांगा. नांदेडच्‍या शासकीय रुग्‍णालयातील मृत्‍यूंना पूर्णपणे महाराष्‍ट्र सरकार जबाबदार आहे. मुख्‍यमंत्र्यांनी आरोग्‍य मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. कारण २५ हून अधिक लोक दगावले आहेत आणि त्‍यात १२ लहान मुले आहेत. या मुलांच्‍या आईला काय उत्‍तर देणार तुम्‍ही. ठाण्‍यात देखील असेच प्रकरण उघडकीस आले होते. आता नांदेडमध्‍ये मृत्‍यू झाले आहेत. इतर ठिकाणाहून देखील अशा बातम्‍या येताहेत, हे पूर्णपणे सरकारचे अपयश आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. या सरकारच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल झाला पाहिजे, असे त्‍या म्‍हणाल्‍या.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murderous government supriya sule criticism from the death of nanded hospital mma 73 ysh
Show comments