अनिल कांबळे
नागपूर : गेल्या सहा महिन्यांत राज्यातील प्रमुख चार शहरांमध्ये खून, खुनाचे प्रयत्न झाल्याच्या घटना वाढल्या आहेत. पोलिसांच्या अर्धवार्षिक अहवालात अशा एकूण ६०२ घटना नोंदवण्यात आल्या आहेत. राज्यात गेल्या सहा महिन्यात मुंबई, नागपूर, पुणे आणि ठाणे या शहरात खून आणि खुनाचा प्रयत्न केल्याच्या ६०२ घटना उघडकीस आल्या. यामध्ये मुंबईत सर्वाधिक ६८ हत्याकांड आणि १८४ खुनाचा प्रयत्न केल्याच्या घटनांची नोंद झाली आहे. दुसऱ्या स्थानावर पुणे शहर असून येथे ४७ खून आणि १२० खुनाचा प्रयत्न केल्याच्या घटनांची नोंद आहे. ठाणे शहरात ३९ खून आणि ९२ खुनाचा प्रयत्न केल्याच्या घटना घडल्या आहेत. नागपुरात ३८ खून आणि ६४ खुनाचा प्रयत्न केल्याच्या घटनांची नोंद आहे.
गुन्हेगारांवर राजकीय वरदहस्त?
अनेक गुन्हेगारांवर राजकीय वरदहस्त असल्यामुळे राज्यातील गुन्हेगारी वाढत आहे. तसेच गुन्हेगारांवरील वचक संपताना दिसत आहे. मुंबई, ठाणे, औरंगाबाद, नागपूर आणि पुण्यात अनेक गुन्हेगारांना राजकीय आश्रय असल्याची अनेक उदाहरणे याआधीही समोर आली आहेत.