अकोला : व्यक्तीची आर्थिक व कर्जाची पार्श्वभूमी ‘सिबिल स्कोर’ द्वारे स्पष्ट होते. बँकांमधून कर्ज घेतांना ‘सिबिल स्कोर’ला अनन्य साधारण महत्व असते. आता लग्न करण्यासाठी देखील मुलाचा ‘सिबिल स्कोर’ हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरेल, असे म्हणल्यास विश्वास वाटणार वावगे ठरणार नाही. मात्र, हे खरे आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे मुलाचा ‘सिबिल स्कोर’ खराब असल्याने जमलेले लग्न मोडल्याचा प्रकार घडला. मुलाचे आर्थिक व्यवहार योग्य नसल्यावर आम्ही मुलगी का द्यावी? असा प्रश्न मुलीकडच्या नातेवाईकांनी केला. आता लग्नाळू मुलांना आपला ‘सिबिल स्कोर’ सुद्धा सांभाळावा लागणार आहे.
‘सिबिल स्कोर’ हा ‘क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड’ (CIBIL) कडून जारी केला जाणारा एक तीन अंकी क्रमांक आहे. हा स्कोर एखाद्या व्यक्तीच्या कर्जाच्या इतिहासाचा सारांश असतो. ‘सिबिल स्कोर’ हा कर्जदात्यांसाठी कर्ज अर्जांचे मूल्यांकन करण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. ‘सिबिल स्कोर’ हा कर्जदात्यांसाठी पहिली छाप म्हणून काम करतो. जितका जास्त ‘सिबिल स्कोर’ असेल तितकी कर्जाचे पुनरावलोकन आणि मंजूर होण्याची शक्यता जास्त असते. ‘सिबिल स्कोर’ हा व्यक्तीच्या आर्थिक भविष्याची व्याख्या करणारा सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरतो. ‘सिबिल स्कोर’मुळे कर्जदारांना जलद कर्ज मिळू शकते. ‘सिबिल स्कोर’ खराब असल्यास बँकांकडून कर्ज नाकारणे अथवा जास्त व्याजदर लागण्याची शक्यता असते.
लग्नाळू मुला-मुलींचे विवाह जमवतांना कुटुंब, कुंडली जुळवणे, नोकरी, वार्षिक वेतन (पॅकेज), संपत्ती, आरोग्य, सण-वार, परंपरा, परिवाराची पार्श्वभूमी, जबाबदारी, स्वभाव आदी मुद्दे पाहिले जातात. आता त्यामध्ये आणखी एक ‘सिबिल स्कोर’ मुद्द्याचा समावेश झाला आहे. मूर्तिजापूर येथे ‘सिबिल स्कोर’मुळे विवाह मोडल्याची घटना घडली. दोन परिवारांमध्ये विवाहाची बोलणी होऊन लग्न देखील ठरले होते. लग्नाच्या नियोजनाची चर्चा सुरू झाली. लग्नासाठी मुलाच्या घरी बैठक घेण्यात आली. यावेळी मुलीच्या मामांनी मुलाचा ‘सिबिल स्कोर’ तपासण्याची भूमिका घेतली. त्यामध्ये मुलाचा ‘सिबिल स्कोर’ अतिशय कमी असल्याचे समोर आले. भावी नवरदेव कर्जबाजारी असल्याचे समोर आल्याने बैठकीला वेगळेच वळण प्राप्त झाले. मुलगा आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याने मुलगी का द्यावी? असा प्रश्न मुलीच्या नातेवाइकांनी उपस्थित केला. अखेर मुलाच्या खराब ‘सिबिल स्कोर’मुळे जुळलेले लग्न मोडले. या प्रकाराची चांगलीच चर्चा होत आहे.