अकोला : विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने आपली पाचवी यादी सोमवारी सायंकाळी जाहीर केली. यामध्ये १६ जागांवर उमेदवार देण्यात आले आहेत. पश्चिम वऱ्हाडातील मूर्तिजापूरसह तीन जागांचा समावेश आहे. मूर्तिजापूरमधून उद्योजक, बिल्डर सुगत वाघमारे यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. लोकसभाप्रमाणे विधानसभा निवडणुकीत सुद्धा वंचित आघाडी स्वबळावर मैदानात उतरली आहे. महायुती व मविआमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू असतांनाच उमेदवार जाहीर करण्याच्या बाबतीत वंचितने आघाडी घेतली. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या स्वाक्षरीने सोमवारी सायंकाळी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. या यादीमध्ये राज्यातील १६ विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्यात आले आहेत.
हेही वाचा : नागपुरात आणखी एक ‘हिट अँड रन’, पहाटे घडला थरार…
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात सुगत वाघमारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुगत वाघमारे यांची मूर्तिजापूर मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली. गत विधानसभा निवडणुकीत मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांना वंचित आघाडीच्या उमेदवार प्रतिभा अवचार यांनी काट्याची लढत दिली होती. अखेरच्या काही फेऱ्यांमध्ये पिंपळे यांनी निसटता विजय मिळवला होता. आता वंचित आघाडीने सुगत वाघमारे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. वाघमारे यांच्या उमेदवारीमुळे मूर्तिजापूरमधील राजकीय समीकरण बदलण्याची चिन्हे आहेत. वाशीम जिल्ह्यातील रिसोड मतदारसंघातून प्रशांत गोळे, तर मेहकर विधानसभा मतदारसंघातून डॉ. ऋतुजा चव्हाण यांना वंचित आघाडीने उमेदवारी दिली आहे.
हेही वाचा : अचलपूरच्या भाजप उमेदवाराविरोधात पक्षाअंतर्गत सामूहिक बंड; ‘डमी’ उमेदवार दिल्याचा आरोप
यादीमध्ये उमेदवारांच्या जातीचा उल्लेख
वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची आज पाचवी यादी जाहीर केली. वंचित आघाडीच्या प्रत्येक यादीमध्ये उमेदवारांच्या जातीचा उल्लेख आहे. लोकसभा निवडणुकीपासून वंचित आघाडीने ही प्रथा सुरू केली. विधानसभा निवडणुकीत सुद्धा ती कायम आहे. आज जाहीर केलेल्या १६ जणांमध्ये ११ बौद्ध उमेदवारांना संधी देण्यात आली. कुणबी, बंजारा, लिंगायत, माळी व मांग समाजाचा प्रत्येकी एक उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. आतापर्यंत वंचितने जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये मुस्लीम व बौद्ध समाजाच्या उमेदवारांना प्राधान्य दिल्याचे दिसून येते.