राम भाकरे

कीर्ती शिलेदार यांची खंत

पूर्वी संगीत नाटकाला मोठा प्रेक्षक वर्ग होता. त्यामुळे नाटकाला राजाश्रय आणि लोकाश्रय लाभायचे. मात्र, कालांतराने त्यात काम करणारे कलावंत कमी झाले आणि नाटकांचे सादरीकरणही कमी झाले. आज काही संगीत नाटके सादर होत असली तरी त्याला प्रेक्षक नाही, अशी खंत ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या अध्यक्ष व ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांनी व्यक्त केली.

नागपुरात उद्यापासून सुरू होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनासाठी कीर्ती शिलेदार नागपुरात आल्या असता त्या बोलत होत्या. पूर्वी संगीत नाटके ही पाच ते सहा चालत होती. मात्र, कालांतराने ती तीन तासांची करण्यात आली. त्यानंतरही प्रेक्षक मिळत नाही. संगीत नाटकात काम करणे खरे तर कठीण आहे. त्यात श्रम जास्त असतात. आवाजाची फेक असावी लागते. त्यामुळे संगीत नाटक सादर करण्यासाठी कोणी धजावत नाही. संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दिल्लीमध्ये संगीत नाटक केले आणि तेथील हिंदी भाषिकांना ते आवडले. प्रेक्षक वर्ग कमी झाला असला तरी संगीत नाटक मात्र संपणार नाही. मधला काळ संगीत नाटकासाठी चांगला नसला तरी येणाऱ्या काळात चांगले दिवस येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ज्यांना काम करायचे नाही असे लोक संगीत नाटकावर टीका करीत असतात. राज्य शासनाच्यावतीने संगीत नाटय़ स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात पाच संस्थांचा सहभाग होता.  सध्या संगीतामध्ये जो धांगडधिंगा सुरू आहे तो फार काळ टिकणारा नाही. सध्या नाटय़गीत केवळ मैफिली पुरती उरली आहे. छोटा ख्याल म्हणून नाटय़गीते सादर होऊ लागली. जिथे जास्त पैसा मिळतो त्याकडे गायक कलावंताचा ओढा असतो. संगीत नाटक आणि मैफिली गायन याचे अर्थकारण वेगळे आहे. झाडीपट्टी रंगभूमीवर काम केले आहे आणि त्याचा अनुभव वेगळा आहे. झाडीपट्टीने संगीत नाटक जिवंत ठेवले आहे. कालांतराने त्यात बदल केले जात आहेत. मात्र, त्याला मोठा प्रेक्षकवर्ग आहे. गेल्या वर्षभराचा संमेलनाध्यक्षाचा कार्यकाळ हा समाधानकारक गेला आहे. अनेक शहरात संगीत नाटक कार्यशाळा घेतल्या, मार्गदर्शन केले आहे. संगीत नाटकासाठी कलावंत तयार करण्यात आले तरी प्रेक्षक वर्ग तयार करणे हे येणाऱ्या काळात मोठे आव्हान असल्याचे शिलेदार म्हणाल्या. संमेलनात सादर होणाऱ्या कलाकृतीचा एक दस्तऐवज ठेवून तो नव्या पिढीसमोर आणला गेला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.