नागपूर : फुटाळा तलावातील म्युझिकल फाऊंटनच्या धर्तीवर मुंबईच्या चौपाटीवर सुद्धा या पद्धतीचा ‘म्युझिकल फाऊंटन’ तयार करायचा आहे. राज्यात सरकार बदलल्यामुळे आता मुंबई सुद्धा बदलत आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
जगभरात आकर्षणाचे केंद्र असलेल्या फुटाळा तलावातील ‘म्युझिकल फाऊंटन’चा गुरुवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह राज्यातील मंत्री आणि आमदारांनी आनंद घेतला. यावेळी शिंदे म्हणाले, आज अप्रतिम असे तरंगते कारंजे अनुभवायला मिळाले. जगातील सगळ्यात उंच कारंजा नागपूरमध्ये असून या प्रकल्पाचे शिल्पकार नितीन गडकरी आहेत याचा आम्हाला आनंद आहे. पायाभूत सुविधा म्हणजे विकास झाला असे मानणाऱ्यांपैकी गडकरी नाही, असेही शिंदे म्हणाले.
हेही वाचा: नागपूर : ‘ली’ पुन्हा एकदा गर्भवती, यावेळी तरी…
आजच्या धकाधकीच्या जीवनात विरंगुळा आणि मनोरंजन पाहिजे. या ‘फाऊंटन’चा आनंद घेतला की तणाव निघून जाईल आणि आगळावेगळा आनंद अनुभवता येईल. आम्ही यात खारीचा वाटा दिला आहे. नागपूर बदलणार आहे पण मुंबई सुद्धा आता बदलेल, असेही शिंदे म्हणाले.
राहुल नार्वेकर म्हणाले, अधिवेशन सुरू असताना सर्व आमदारांना हे ‘फाऊंटन’ दाखवा म्हणजे सभागृहात असलेला तणाव दूर होईल. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला शुभेच्छा देत जी काही मदत लागेल ती राज्य सरकारकडून केली जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी नितीन गडकरी यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले.