गडचिरोली : सध्या राज्यभरात बारावी आणि दहावीच्या परीक्षा सुरू आहेत. याकालावधीत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण निर्माण उद्भवू नये यासाठी मुस्लीम बांधवांनी समाजभान जपत मशिदीवरील ध्वनिक्षेपक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त जारावंडी गावाची पंचक्रोशीत चर्चा आहे. बारावी बोर्डाच्या परीक्षेला राज्यभरात २१ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. कोविडच्या साथीनंतर दोन वर्षांनी पुन्हा पूर्ववत परीक्षा घेतली जात आहे. एटापल्ली तालुक्यातील जारावंडी येथे बारावी आणि दहावीचे परीक्षा केंद्र आहे.
हेही वाचा >>> ज्ञानाच्या ‘पेटंट’ची गरज काय? डॉ. मोहन भागवत यांचा सवाल
या केंद्रावर जारावंडी कसनसूर आणि जंभिया या शाळेचे विद्यार्थी परीक्षा देण्याकरिता आले आहेत. बारावीचे दोन पेपर झालेले आहेत. गुरुवारपासून दहावीची परीक्षा सुरू होणार. दहावीचे विद्यार्थी सकाळी उठून अभ्यास करतात. अशात दिवसातून पाच वेळा मस्जिदीवर भोंगे लावून नमाज पढले जायचे. त्यामुळे अभ्यास करताना मुलांना त्रास होऊ नये यासाठी परीक्षेच्या कालावधीत मशिदीवरचे ध्वनिक्षेपक बंद ठेवण्याचा निर्णय जारावंडी येथील मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. नमाजाच्या वेळी भोंगे लावण्याचे टाळले आहे. त्यांच्या या कार्यामुळे मुस्लिम बांधवांचे कौतुक होत आहे आणि परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून आभार व्यक्त केले जात आहेत.