लोकसत्ता टीम
नागपूर: लव्ह जिहाद म्हणजे मुस्लिमांनी चालवलेला धर्मांतरणाचा आणि लोकसंख्या वाढीचा प्रयत्न आहे. त्यामुळे धर्मांतरण कायद्याच्या माध्यमातूनच त्याचा अटकाव शक्य आहे. केंद्रासह राज्य सरकारने त्यासाठी लव्ह जिहाद विरोधी कायदा तात्काळ करावा, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी केली.
आणखी वाचा- बुलढाणा : संप, अवकाळी अन् आता ‘रोजगार हटाव’! अडीचशेवर अतिक्रमित दुकाने जमीनदोस्त
बजरंग दलाच्या अखिल भारतीय शिबिराच्या निमित्ताने परांडे शुक्रवारी नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. अनेक राज्यांमध्ये विश्व हिंदू परिषद धर्मांतरण आणि लव्ह जिहाद विरोधी कायद्यासाठी प्रयत्न करत आहे. सर्व राज्यांनी याविरोधात धोरण ठरवणे गरजेचे आहे. या विरोधात धोरण आणि कायदा करण्याचे काम हे सरकारचे आहे. ख्रिश्चन समुदायाची संख्या वाढावी म्हणून चेन्नईमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये देशातील ४ लाख गावांमध्ये ख्रिश्चन धर्मीयांचे प्रार्थनास्थळ नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यासाठी धर्मांतरण वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत. या विरोधात देशातील एक लाख गावांमध्ये आम्ही जाळे तयार केले आहे. मात्र, दुर्दैवाने धर्मांतरणासाठी काम करणारे जास्त असल्याने यावर नियंत्रण राहत नसल्याचे परांडे यांनी नमूद केले. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे प्रशांत तितरे, संपर्क विभाग प्रमुख मनीष मालानी उपस्थित होते.
आणखी वाचा- ‘एमबीबीएस’ला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून डॉक्टरची फसवणूक
राममूर्तीची प्रतिष्ठापना पुढच्या वर्षी
पुढील वर्षी १५ जानेवारी पासून उत्तरायण सुरू होईल. या १५ जानेवारी ते ३० जानेवारीच्या काळात अयोध्येमध्ये नवनिर्मित मंदिरात भगवान रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा मानस आहे. हा स्वप्नवत सोहळा होणार असून या सोहळ्यात संपूर्ण समाज सहभागी होऊ शकेल, अशीही माहिती मिलिंद परांडे यांनी दिली.
आम्ही धीरेंद्र शास्त्रींच्या पाठीशी
धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्या मुंबईतील कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विरोध केला तरी विश्व परिषद मात्र त्यांच्या पाठीशी आहे. काही लोकांना फक्त हिंदू धर्मामध्येच वाईटपणा दिसून येतो. ख्रिस्ती लोकांच्या सभेसंदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते कधीच काही करत नाही, असेही परांडे म्हणाले.