बुलढाणा : विदर्भ पंढरी म्हणून विख्यात असलेल्या शेगाव नगरीत आज ‘मटण नाट्य’ ने खळबळ उडाली. कुत्र्यांनी मंदिरात आणून टाकलेले मटण संतप्त भाविकांनी इतर केर कचऱ्यासह शेगाव पालिकेत आणून टाकले. यामुळे पालिकेसह संतनगरीत खळबळ उडाली.
आठवडी बाजार परिसरात असलेल्या स्वामी समर्थ मंदिरामध्ये आज सोमवारी बाजूच्या ‘मटन मार्केट’मधून कुत्र्यांनी खूप मोठे मटणाचे व घाण कचऱ्याचे तुकडे मंदिर परिसरात आणून टाकले. यामुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली. संतप्त नागरिक आज दुपारी मटण माश्यांचे तुकडे व तेथील घाण कचरा उचलून नगरपालिकेत पोहोचले. प्रशासन अधिकारी यांच्या दालनासह आरोग्य विभाग आणि मुख्याधिकाऱ्याच्या कक्षासमोर मटणाचे तुकडे टाकून देण्यात आले.
हेही वाचा – नागपूर : ‘समृद्धी’वर रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांना प्रतिबंध लागणार
दरम्यान, स्वामी समर्थ मंदिराच्या समोर नगरपालिकेने अनधिकृतपणे मच्छी आणि मटण विक्रेत्यांना बसण्यासाठी जागा दिली आहे. परिणामी भाविकांना नेहमी त्रास व मानसिक कुचंबणा सहन करावी लागते. या मटण मच्छी मार्केटमधील घाण कचरा व फेकून देण्यात आलेले मटणाचे तुकडे या भागातील कुत्रे उचलून बाजूच्याच मंदिर परिसरात आणून टाकतात यामुळे या परिसरात नेहमीच दुर्गंधी राहते.