लोकसत्ता टीम
अमरावती : मूळ मालकाऐवजी तोतयाला उभे करून बनावट दस्तावेजांच्या आधारे दोन भूखंडांची परस्पर विक्री करण्यात आली. मूळ मालकाने ऑनलाइन सातबारा उतारा काढल्याने हे गैरप्रकार उघड झाला. या प्रकरणी मूळ मालकाच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी आठ आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
सुरेश श्रीकृष्णराव टाले (४३) रा. रेवसा, अमरावती, कन्हैया घनश्याम पांडे (३२) रा. दहिसाथ चौक, अमरावती, किशन चंपालाल भट्टड (६२) रा. चंद्रपूर, अभिजित विजय गरड रा. नाशिक, शेखर गोपालराव काळमेघ रा. धामणगाव, सुनील माणिकराव करवा रा. अमरावती, अजमत खान लियाकत खान रा. भानखेडा, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पुणे येथील हडपसर भागात राहणारे पंकज मधुकर आगरकर (५०) यांच्या मालकीच्या मौजा कठोरा व मासोद येथील दोन भूखंडांची परस्पर विक्री करून त्या व्यवहाराची नोंदणी देखील करण्यात आली. तलाठी आणि नोंदणी कार्यालयामध्ये जाऊन खात्री केल्यावर पंकज आगरकर यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांना मानसिक धक्का बसला. खोटे दस्तऐवज, आधार कार्ड बनवून, इतकेच नव्हे, तर तोतया मालक उभा करून आपली फसवणूक करण्यात आल्याचे पंकज आगरकर यांच्या लक्षात आले.
आणखी वाचा-अमरावती : फोनवरून संपर्क केल्याचा वाद आणि पती-पत्नीची आत्महत्या
पंकज आगरकर हे हडपसर, पुणे येथील रहिवासी असले, तरी त्यांच्या मालकीच्या दोन्ही स्वतंत्र भूखंडांचा नोंदणी व्यवहार करताना तोतयाने त्यांचे बनावट आधार कार्ड त्याला जोडले. त्या आधार कार्डवर पंकज आगरकर रा. चैतन्यवाडी, बुलडाणा असे नमूद आहे. त्यापुढे जाऊन या प्रकरणात आधार कार्ड व्हेरिफिकेशन झाल्याचेही नमूद आहे. त्यामुळे या कटात बोगस आधार कार्ड बनविणाऱ्यांसह साक्षीदार, शासकीय अधिकारी, कर्मचारी देखील सहभागी असल्याचा आरोप पंकज आगरकर यांनी केला आहे. त्या आधार कार्डवरील केवळ नाव वगळले, तर त्यावरील फोटोदेखील पंकज आगरकर यांचा नाही. हा संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर पंकज आगरकर यांनी कोतवाली ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.