नागपूर : भाजपचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी झाली असून, एकूण १० पैकी सात जागांवर आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. यात पाच जागा जिंकून काँग्रेसने मुसंडी मारली आहे. महायुतीला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले.
विजयी उमेदवारांमध्ये भाजप नेते नितीन गडकरी (नागपूर), काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर (चंद्रपूर) यांचा, तर प्रमुख पराभूत उमेदवारांमध्ये भाजपच्या नवनीत राणा (अमरावती), वंचितचे प्रकाश आंबेडकर (अकोला) यांचा समावेश आहे. नागपूरमध्ये भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हॅट्ट्रिक केली. चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी भाजप नेते व विद्यामान वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा दोन लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. गडचिरोलीमध्ये काँग्रेसचे नामदेव किरसान यांनी भाजपचे खासदार अशोक नेते यांचा, भंडारा-गोंदियामध्ये काँग्रेसचे प्रशांत पडोळे यांनी भाजपचे खासदार सुनील मेंढे यांचा, तर रामटेकमध्ये काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांनी शिवसेना शिंदे गटाचे राजू पारवे यांचा पराभव केला. अमरावतीमध्ये भाजपच्या नवनीत राणा यांचा काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांनी पराभव केला.
हेही वाचा >>>बळवंत वानखडेंच्या विजयात ‘या’ मतदार संघाचा मोठा वाटा; अमरावती, तिवसा, दर्यापूर आणि अचलपूरमधून मताधिक्य
संजय देशमुख विजयी
●शिवसेना उद्धव ठाकरे गटाने बुलढाणा व यवतमाळ-वाशीम अशा दोन जागा लढवल्या होत्या. त्यापैकी यवतमाळ-वाशीम मतदार संघातून ठाकरे गटाचे संजय देशमुख यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी शिंदे गटाच्या राजश्री पाटील यांचा ७० हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.
●विदर्भात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने एकच जागा लढवली होती. वर्ध्यातून या पक्षाचे अमर काळे यांनी भाजपचे विद्यामान खासदार रामदास तडस यांचा पराभव केला.
●भाजपला सातपैकी नागपूर, अकोला या दोनच जागा जिंकता आल्या. नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसचे विकास ठाकरे यांचा एक लाखाहून अधिक मतांनी पराभव केला.
भंडारा, अकोला, अमरावतीत चुरस
विदर्भातील भंडारा, अकोला आणि अमरावती या तीन मतदारसंघांत मतमोजणीदरम्यान प्रत्येक फेरीनिहाय विजयाचा कल बदलत राहिला. भंडाऱ्यात भाजपचे सुनील मेंढे विरुद्ध काँग्रेसचे प्रशांत पडोळे यांच्यात शेवटपर्यंत रस्सीखेच सुरू होती. अमरावतीत भाजपच्या नवनीत राणा सुरुवातीला काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांच्यात चुरस होती.
आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर
अकोल्यात भाजपचे अनुप धोत्रे विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे अजय पाटील यांचा ३८ हजार मतांनी पराभव केला. येथे वंचितचे प्रकाश आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर होते. शिवसेना शिंदे गटाने बुलढाण्याची जागा कायम राखली. तेथे विद्यामान खासदार प्रतापराव जाधव विजयी झाले.