बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्याचे भौगोलिक रित्या घाटावर आणि घाटाखाली असे भाग पडतात. राजकारण आणि सामाजिकदृष्ट्या देखील असेच चित्र आहे. या घाटाखालील तीन तालुक्याना चार महिन्यापासून छळणाऱ्या केसगळती आणि टक्कल या गूढ आणि विचित्र आजाराने आता घाटावरील तालुक्यातही चंचू प्रवेश केल्याचे धक्कादायक चित्र आहे. घाटावरील दोन तालुक्यात केस गळतीचे सहा रुग्ण आढळून आले आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा खळबळून जागा झाल्या असून ‘अलर्ट मोड’ वर आल्या आहेत. दुसरीकडे या दोन तालुक्यातील नागरिकात भीती निर्माण झाली आहे.
मागील ८ जानेवारी २०२५ रोजी शेगाव तालुक्यात आकस्मिक केस गळती व टक्कल पडण्याचे रुग्ण आढळून आले. प्रारंभी काही गावापुरते मर्यादित या गूढ आजाराचा झपाट्याने प्रसार झाला. गावांची आणि बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढली. १९ मार्च पर्यंत आजाराने १९ गावात शिरकाव केला. ८ ते ३१ जानेवारी दरम्यान रुग्णसंख्या २४६ वर पोहोचली. १ ते २८ फेब्रुवारी दरम्यान यात ४७ तर १ ते १८ मार्च दरम्यान यात ४ रुग्णांची भर पडली. शेगाव तालुक्यातील बोन्डगाव, कालवड, काठोरा, भोनगाव, हिंगना, घुई, तरोडा खुर्द, वरखेड खुर्द, कनारखेड, गायगाव, नागझरी, पळसखेड, पहूरजिरा, माटरगाव बुद्रुक, नींबी, जलंब या गावात रुग्ण आढळले. प्रारंभी शेगाव तालुक्या पुरते मर्यादित असलेल्या या आजाराने नांदुरा व खामगाव तालुक्यात घुसखोरी केली.नांदुरा तालुक्यातील वाडी (७ रुग्ण), खामगाव तालुक्यातील जयपूर लांडे (२) या गावातही आजाराने चंचु प्रवेश केला. मात्र याची लागण मर्यादित राहिली.
या पार्श्वभूमीवर केस गळतीच्या आजाराने अलीकडे घाटावरील मेहकर व चिखली तालुक्यातही चंचु प्रवेश केला आहे. चिखली तालुक्यात केस गळती व टक्कल चे चार रुग्ण आढळून आले आहे. मेहकर तालुक्यातही दोन रुग्ण आढळून आले आहे.मेहकर तालुक्यातील दुर्गबोरी या आदिवासी बहुल व दुर्गम भागातील गावठी रुग्ण आढळणे धक्कादायक बाब मानली जात आहे.दुर्गबोरी येथील एका युवकाचे केसं गळू लागल्याने त्याने मेहकर ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील चव्हाण यांनी त्याची तपासणी केली., मागील काही दिवसापासून केस गळतीचा त्रास होतं असून केस गळू नये, म्हणून टक्कल केलं पण नवीन आलेले केस सरळ हात लावल्यावर गळत आहेत. त्याला पाहता डॉक्टरांनी मल्टी व्हिटॅमिन, अँटी फंगल औषधी दिली. पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय बुलढाणा येथे जाण्याचा सल्ला दिला.केस गळती आता नियंत्रणात असली तरी १९ मार्च अखेर १९ गावात २९७ रुग्णांची नोंद झाली होती. आता चिखली व मेहकर तालुक्यात सहा रुग्ण आढळल्याने रुग्ण संख्या ३०० च्या पार गेली आहे.
चार महिन्यानंतरही अहवालाला मुहूर्त नाही!
गल्ली ते दिल्ली तील आरोग्य यंत्रणा, संस्था यांनी पाहणी केली, नमुने संकलन व परीक्षण केले. अगदी भारतीय वैध्यकीय संशोधन परिषद ( आयसीएमआर दिल्ली व चेन्नई ) ने सुद्धा भेट दिली. मात्र या संस्थेचा बहुप्रतीक्षित अहवाल अजूनही जाहीर करण्यात आला नाही. मागील ३ फेब्रुवारी रोजी अहवाल जाहीर करण्यासाठी महाराष्ट्र सदन दिल्ली मध्ये आयोजित पत्रकार परिषद एन वेळी रद्ध करण्यात आली. त्यानंतर याला मुहूर्तच मिळाला नाही.