लोकसत्ता टीम

अमरावती: जिल्‍ह्यातील यावली शहीद येथे बुधवारी पहाटे एका घरात जोरदार स्‍फोट होऊन साहित्‍याचे नुकसान झाले. या स्‍फोटाचा आवाज बराच दूर अंतरापर्यंत ऐकू गेला. शेजारील घरांनाही हादरे बसल्‍याने नागरिकांमध्‍ये भीती पसरली होती. घटनास्‍थळी वरिष्‍ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा केला असून, स्फोट कशामुळे झाला यामागील गूढ अजूनही उकलले नाही. चौकशीसाठी बॉम्‍बशोधक पथकास पाचारण करण्यात आले आहे.

माहुली पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीतील यावली शहीद येथे जितेंद्र होले यांचे घर आहे. बुधवारी पहाटे अडीच वाजताच्‍या सुमारास होले यांच्‍या स्‍वयंपाक घरात आणि दिवाणखान्‍यात अचानक स्‍फोट झाला. या घटनेत सुदैवाने कुणाला इजा झाली नाही, पण घरातील साहित्‍याचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच माहुली पोलीस ठाण्‍याच्‍या पथकाने तत्‍काळ पो‍हचून चौकशी सुरू केली. घटना गंभीर असल्‍याने पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक शशिंकात सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यकांत जगदाळे, स्‍थानिक गुन्‍हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे, माहुलीचे प्रभारी अधिकारी मिलिंद सरकटे, चांदूरबाजारचे ठाणेदार सूरज बोंडे, शिरखेडचे ठाणेदार सूरज तेलगोटे यांनी घटनास्‍थळी भेट देऊन पाहणी केली.

आणखी वाचा-अकोला: दोन गावांना पुराचा वेढा; शेतकरी अडकला पुरात, आपत्कालीन पथकाने वाचवला जीव

घटनास्‍थळी बॉम्‍ब शोधक व नाशक पथकाचे पोलीस निरीक्षक प्रदीप चौगावकर यांच्‍या नेतृत्‍वातील पथकाला, ठसेतज्‍ज्ञांना तसेच येथील न्‍यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्‍या चमूला पाचारण करण्‍यात आले. सर्व पथकांनी घराचे बारकाईने निरीक्षण केले असता, घटनास्‍थळी कुठल्‍याही प्रकारचे स्‍फोटक पदार्थ आढळून आले नाहीत. घरगुती गॅस सिलिंडरचाही स्‍फोट झालेला नसल्‍याचे दिसून आले. ड्रेनेज लाईनमधून वायू घरात गोळा झाल्‍याने त्‍याचा स्‍फोट झाला असण्‍याचा प्राथमिक अंदाज तज्‍ज्ञांनी वर्तवला आहे. घरातील विविध वस्‍तूंचे नमुने तपासणीसाठी न्‍याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठविण्‍यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्‍त झाल्‍यानंतर यथायोग्‍य निष्‍कर्ष काढता येऊ शकेल, असे स्‍थानिक गुन्‍हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांनी सांगितले.

Story img Loader